एस्.टी.च्या कामगार संघटनांनी दोन दिवसांत अवमान याचिकेवर उत्तर सादर करावे ! – उच्च न्यायालय

मुंबई उच्च न्यायालय

मुंबई – राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांच्या संपाच्या प्रकरणी कामगार संघटनांनी दोन दिवसांत अवमान याचिकेवर उत्तर सादर करावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

राज्य परिवहन महामंडळाचे राज्यशासनामध्ये विलीनीकरण करावे, यासाठी मागील ३ दिवसांपासून कर्मचार्‍यांचा संप चालू आहे; मात्र न्यायालयाने हा संप अवैध ठरवून महामंडळाला अवमान याचिका प्रविष्ट करण्याची अनुमती दिली होती. त्यानुसार आज या याचिकेवर सुनावणी झाली. कामगार संघटनांनी दोन दिवसांत या याचिकेवर उत्तर सादर करावे, असे सांगून १५ नोव्हेंबर या दिवशी नियमित न्यायालयाच्या पुढे सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने घोषित केले.

या याचिकेत राज्य परिवहन महामंडळाने एकूण ३४३ जणांविरोधात अवमान केल्याविषयी नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यात संपात सहभागी झालेल्या संघटनांचे नेते, पदाधिकारी, तसेच इतर कामगारांना संपाच्या काळात कामावर न येण्यासाठी चिथावणी देणार्‍यांचा प्रामुख्याने समावेश आहे.