देशी गायीच्या दुधामुळे होणारे अनेक अमूल्य लाभ !

संपूर्ण आहार असणार्‍या आणि सात्त्विकता प्रदान करणार्‍या देशी गायीच्या दुधाचे महत्त्व जाणा !

‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत लाभदायक आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. देशी गायीच्या दुधाचे लाभ आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केले आहेत.

  • वैज्ञानिकांच्या मते गायीच्या दुधात ८ प्रकारचे प्रोटीन्स, ६ प्रकारचे व्हिटॅमिन्स, २१ प्रकारचे अमिनो ॲसिड (आम्ल), ११ प्रकारचे मेद (चरबी) युक्त ॲसिड, २५ प्रकारची खनिज तत्त्वे, तसेच सोने, तांबे, लोह, कॅल्शियम, आयोडिन, फ्लोरिन, सिलिकॉन इत्यादी मुख्य खनिजेही आढळून येतात.
  • देशी गायीच्या दुधात ही सर्व तत्त्वे असल्याने ते एक उत्कृष्ट रसायन (टॉनिक) आहे. हे दूध शरिरात जाऊन रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि वीर्य यांची यथायोग्य प्रमाणात वृद्धी करते. हे दूध पित्तशामक आणि बुद्धीवर्धक असून सात्त्विकता वाढवते.

आधुनिक वैज्ञानिकांनी संशोधनातून सिद्ध केलेले गायीच्या दुधाचे महत्त्व अनेक वैज्ञानिकांनी गायीच्या दुधावर केलेल्या संशोधनाच्या आधारे स्वत:ची मते व्यक्त केली आहेत. त्यातील काही जणांची मते येथे दिली आहेत.

१. गायीचे दूधच एकमेव असा खाद्यपदार्थ आहे, जो सर्व पौष्टिक द्रव्यांनी परिपूर्ण आहे. गायीचे दूध म्हणजे संपूर्ण आहार आहे. – प्रो. एम्.जे. रोसेनो (हॉर्वर्ड चिकित्सा विद्यालय)

२. गायीचे दूध मातेच्या दुधानंतर असलेले सर्वाधिक उपयोगी दूध आहे. – जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच्.ओ.)

३. हृदयविकार असणार्‍या रुग्णांसाठी गायीचे दूध विशेष रूपाने उपयोगी आहे. – डॉ. शांतीलाल शाह, अध्यक्ष, इंटरनॅशनल कार्डिओलॉजी कॉन्फरन्स

४. गायीच्या दुधामुळे स्मरणशक्ती वाढते. दुधातील प्रोटीनमुळे रक्तकोशिकांमध्ये कर्करोगाचा शिरकाव होऊ शकत नाही. – पशूविज्ञान विशेषज्ञ प्रो. रोनाल्ड गोरायटे (कारनेल विश्वविद्यालय)

५. गायीच्या दुधात बुद्धी कुशाग्र करण्याचा विशेष गुण आहे. मी याचा प्रयोग लहान मुलांवर करून पाहिला. ज्या मुलांनी गायीचे दूध प्यायला आरंभ केला, त्या मुलांमध्ये प्रतिभा आणि मेधाशक्ती यांचा विकास स्पष्टपणे दिसून आला अन् ज्या मुलांना म्हशीचे दूध प्यायला दिले, ती मुले मंदमती आणि आळशी होऊ लागली. – प्रो. जे.एल्. सहस्रबुद्धे (कृषी महाविद्यालय, पुणे)

६. जर गायीने एखादा विषारी पदार्थ खाल्ला, तर त्याचा परिणाम तिच्या दुधावर होत नाही. गायीच्या शरिरात सामान्य विष पचवण्याची अद्भुत क्षमता असते. – डॉ. पीपल्स

७. गायीच्या दुधाची साय मानवी शरिरास अनुकूल आहे. ही साय लगेच पचून शक्ती देते. – डॉ. एन्.एन्. गोडवेल

८. जर्सी (विदेशी) गायीचे दूध प्यायल्याने कर्करोग वाढण्याची शक्यता ३० टक्के असते. जर्सी गायीचे दूध, दही आणि तूप यांचे सेवन टाळावे.’ – राष्ट्रीय कर्करोग संस्था (अमेरिका)

(साभार : मासिक, ‘लोक कल्याण सेतू’, जून २०१७)