अफगाणिस्तानला साहाय्य करण्यावर एकमत !

अफगाणप्रश्‍नी भारतासह ८ देशांची बैठक

नवी देहली – अफगाणिस्तानातील स्थिती सुधारण्यासाठी भारताच्या पुढाकाराने भारतासह ८ देशांची बैठक येथे १० नोव्हेंबर या दिवशी आयोजित करण्यात आली होती. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत रशिया, इराण, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, कजाकिस्तान, उज्बेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले आहेत. या बैठकीत सर्वच देशांनी अफगाणिस्तानला साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले.

१. बैठकीत डोवाल म्हणाले की, केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही, तर शेजारी देशांसाठी ही बैठक महत्त्वाची आहे. मला आशा आहे की, या बैठकीत अफगाणिस्तानला साहाय्य करण्यासाठी आणि आपली सामूहिक सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील.

२. ताजिकिस्तानच्या सुरक्षा परिषदेचे सचिव नसरलो रहमतजोन महमूदजोदा यांनी सांगितले की, अफगाणिस्तानला लागून आमची मोठी सीमा आहे. तेथून अमली पदार्थांची तस्करी, आतंकवाद आदी कारवाया होण्याची शक्यता आहे. आम्ही शेजारी देशाच्या नात्याने अफगाणिस्तानमधील लोकांना साहाय्य करण्यास सिद्ध आहोत.

३. इराणचे राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अ‍ॅडमिरल अली शामखानी म्हणाले की, अफगाणिस्तानमधील विस्थापितांचे संकट मोठे आहे. ही समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

४. कजाकिस्तान, किर्गिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उज्बेकिस्तान यांच्या प्रतिनिधींही याविषयी त्यांची भूमिका मांडली. सर्वांनीच अफगाणिस्तानच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सूत्राला अनुमदोन दिले.