सार्वजनिक सभांतून मतदानासाठी मतदारांना आमीष दाखवणारे वक्तव्य करणार्‍यांकडे निवडणूक आयोगाची डोळेझाक !

  • कायद्यात कारवाईची तरतूद नाही ! – मुख्य निवडणूक अधिकारी

  • आमीष दाखवणारे विधान करणे, हा व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग ! – सह मुख्य निवडणूक अधिकारी

  • सार्वजनिक सभांमध्ये मतदारांना पैशांचे आमीष दाखवणे हा गुन्हा नसेल, तर उद्या या भ्रष्टाचाराला अधिकृत मान्यता मिळाली नाही, तरच नवल !
  • कायद्यात अशा भ्रष्ट उमेदवारांवर कारवाई करण्याची तरतूद नसणे, हे स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या ७४ वर्षांतील शासनकर्त्यांना लज्जास्पद ! भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आता हिंदु राष्ट्रच हवे !
  • मतदारांना आमीष दाखवणार्‍यांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात नसल्याविषयी सर्व राजकीय पक्षांची आळीमिळी गुपचिळी आहे, हे लक्षात घ्या !
  • लोकहो, मतदारांना आमीष दाखवणार्‍यांना निवडणूक लढवण्यास आजन्म बंदी घालण्याविषयीचा कायदा करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरा !

मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – मतदानात अपप्रकार होऊ नयेत, यासाठी एकीकडे प्रबोधन करणारा निवडणूक आयोग दुसरीकडे मात्र मतदारांना पैसे घेऊन मतदानाचे आवाहन करणार्‍यांवर कोणतीच कारवाई करत नसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मतदारांना आमीष दाखवून मते मागणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नसल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली, तर अशा प्रकारे आमीष दाखवणारे विधान करणे, हे व्यक्तीस्वातंत्र्य आहे, असे धक्कादायक विधान राज्याचे सह मुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी केले. (निवडणुकीच्या काळात पैसे वाटणार्‍यांवर गुन्हे नोंदवले जात असतील, तर पैशांचे आमीष दाखवणार्‍यांवर कारवाई का होऊ शकत नाही ? अशा हतबलतेने निवडणुकांतील अपप्रकार कधी तरी रोखले जातील का ? – संपादक)

नांदेड जिल्ह्यातील देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल मिटकरी यांनी एका सार्वजनिक सभेत ‘कुणाकडून पैसा आलाच, तर येणार्‍या लक्ष्मीला नाकारू नका. त्या पैशांत फटाके आणि फराळ घ्या. भाजपचा पैसा घ्या; पण महाविकास आघाडीला मतदान करा !’, असे आवाहन केले होते. याविषयी ‘अमोल मिटकरी यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे का ?’ असा प्रश्‍न दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना विचारल्यावर त्यांनी अशी नोटीस पाठवण्यात आली नसल्याचे सांगत कारवाई करण्याची कायद्यात तरतूद नसल्याची हतबलता व्यक्त केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही देगलूर येथील पोटनिवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी ‘ज्या गावात भाजपला एकूण मतदानाच्या ७० टक्के मते मिळतील, तेथे माझ्याकडून गावजेवण दिले जाईल’, असे वक्तव्य केले होते. त्यांच्यावरही निवडणूक आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

पैसे वाटणार्‍यांवर कारवाई करणारा निवडणूक आयोग उमेदवारांवर कारवाई का करत नाही ?

मतदानाच्या वेळी पैसे, मद्य किंवा अन्य वस्तू यांचे वाटप करणार्‍या व्यक्तींविरुद्ध निवडणूक आयोगाकडून गुन्हे नोंदवले जातात; मात्र अशा व्यक्ती ज्या उमेदवाराचा प्रचार करतात, ते उमेदवार किंवा राजकीय पक्ष यांच्यावर आयोग कारवाई का करत नाही ?, असा प्रश्‍न विचारला असता, श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘‘अशा प्रकरणांत पोलीस किंवा आयकर विभाग यांच्याकडून कारवाई केली जाते. अशा प्रकरणांत गुन्हा नोंदवणे आणि पुढील कारवाई करणे, हे पोलिसांकडून केले जाते.’’ (उमेदवारांच्या सांगण्यावरूनच मद्य आणि पैसे यांचे वाटप होते, हे उघड गुपित असतांना पोलीस आणि निवडणूक आयोग यांनी याकडे दुर्लक्ष करणे, म्हणजे एकप्रकारे अशा गंभीर गुन्ह्यांना पाठीशी घालण्याचाच प्रकार नव्हे का ? – संपादक)