मंदिरापासून ११४ मीटर अंतरावर असलेला बिअर बार हटवण्याचा आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

हिंदु राष्ट्रात मद्यावर बंदी असेल, त्यामुळे असे प्रश्‍नच निर्माण होणार नाही ! – संपादक

सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने पुद्दुचेरी येथील थ्रोबथियाम्मम् मंदिराच्या जवळ असलेला बिअर बार बंद करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. न्यायालयाने म्हटले की, मंदिराच्या जागेपासून काही अंतरावर ‘जोठी’ नावाचा बिअर बार आहे. त्यामुळे तो बंद करण्याचा आदेश देण्याला कोणताही आधार नाही. मंदिर आणि बिअर बार यांच्यातील अंतर ११४.५ मीटर इतके आहे, म्हणजे १०० मीटरपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तो बंद करण्याचा आदेश देता येत नाही. काही जणांना पूजा करायची असेल, तर काही जणांना मद्य प्यायचे असू शकते.

१. सुनावणीच्या वेळी याचिकाकर्त्यांच्या अधिवक्त्यांनी सांगितले की, मंदिर आणि बार यांच्यातील अंतर अल्प असल्याने काही जण मद्य पिऊन मंदिरात येतात अन् गोंधळ घालतात. मंदिरात चालू असलेल्या अनुष्ठानांच्या वेळीही गोंधळ घातला जातो. त्यामुळे हा बार बंद करावा किंवा त्याचे स्थानांतर करण्याचा आदेश देण्यात यावा.

२. यावर न्यायालयाने म्हटले की, आम्ही भाविकांच्या धार्मिक भावना दुखावू इच्छित नाही; मात्र कायद्यानुसार दोघांतील अंतर पुरेसे असल्याने आम्ही काहीच करू शकत नाही.  मंदिर प्रशासनालाही याविषयी कोणताही आक्षेप नाही, तर आम्ही त्यात हस्तक्षेप का करावा ? तसेच मंदिरात मद्य पिऊन येणारे कुठूनही मद्य पिऊन मंदिरात येऊ शकतात, मग ते अंतर ५०० मीटर असो कि १ सहस्र मीटर.