इस्लाम आणि क्रिकेट यांचा कोणताही संबंध नाही ! – असदुद्दीन ओवेसी यांची पाकच्या गृहमंत्र्यांवर टीका

कधी नव्हे, ते ओवैसी यांनी राष्ट्राच्या बाजूने विधान केले, हे आश्‍चर्यजनकच होय ! – संपादकीय

डावीकडून पाकचे गृहमंत्री शेख रशिद अहमद आणि खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी देहली – आपल्या बाजूच्या देशात (पाकिस्तानात) असणारा एक मंत्री (पाकचे गृहमंत्री शेख रशिद अहमद) वेडा झाला आहे. तो म्हणतो, ‘टी-२० क्रिकेट स्पर्धेमध्ये झालेला भारताविरुद्ध पाकिस्तानचा विजय हा ‘इस्लामचा विजय’ आहे.’  तुम्हीच सांगा इस्लामचा आणि क्रिकेटचा काही संबंध आहे का?’, असा प्रश्‍न विचारत  एम्आयएम्चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानच्या मंत्र्यांवर टीका केली.

ओवैसी पुढे म्हणाले की, तुम्हाला (पाकिस्तानला) लाज वाटत नाही की, तुम्ही एकीकडे स्वतःच्या देशाला चीनकडे गहाण ठेवता आणि दुसरीकडे इस्लामच्या गोष्टी करता. त्याच चीनने २० सहस्र मुसलमानांना कारागृहामध्ये डांबले आहे. तुम्ही कोणत्या इस्लामची गोष्ट करत आहात ते सांगा?  अरे तुम्ही साधे मलेरियाचे औषध बनवू शकत नाही, मोटर सायकलचे टायरदेखील तुम्ही बनवू शकत नाही. आमचा भारत फार पुढे गेला असून आमच्याशी विरोध पत्करू नका, अशी चेतावणीही ओवैसी यांनी पाकला दिली.