‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी  पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ हा कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा !

सनातनच्या साधकांचा सहभाग !

फोंडा – ‘अनाम प्रेम, गोवा’ या परिवाराच्या वतीने १९.१०.२०२१ या दिवशी श्री शांतादुर्गा शंखवाळेश्वरी संस्थान, वेलिंग, प्रियोळ येथे कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने ‘रासलीला’ कार्यक्रम भावपूर्णरित्या साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सनातनच्या साधकांचाही सहभाग होता.

पू. पंडित केशव गिंडे
कु. तेजल पात्रीकर
बासरीवादन करतांना पू. पंडित केशव गिंडे, समवेत कु. परंतप मयेकर आणि तबलावादन करतांना श्री. गिरिजय प्रभुदेसाई

या कार्यक्रमााचा आरंभ दुपारी ‘अनाम प्रेम परिवारा’चे युवक-युवती यांनी बासरी, सतार, तबला, रूद्रवीणा, बुलबुलतरंग आणि सारंगी या वाद्यांवर पंचक वादन करून करण्यात आला. त्यानंतर पू. पंडित केशव गिंडे गुरुजी यांचा शिष्य कु. परंतप मयेकर याने केशव वेणूवर राग यमन सादर केला. (परंतप हे अर्जुनाचे नाव आहे. परंतप याचा अर्थ ‘योद्धा’, ‘तपाद्वारे जो इंद्रियांवर विजय मिळवतो, तो’, असा होतो.) त्यानंतर प्रख्यात बासरीवादक आणि ‘केशववेणू’चे जनक पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे सुमधूर बासरीवादन झाले. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले निमंत्रित मान्यवर, तसेच सनातन संस्था, प्रजापिता ब्रह्मकुमारी, मान मंदिर सेवा संस्थान आदी संस्थांच्या प्रतीनिधींचे अनाम प्रेम परिवाराच्या वतीने पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

श्रीकृष्णावर आधारित भरतनाट्यम् नृत्य सादर करतांना कु. अपाला औंधकर

रात्रीच्या कार्यक्रमात प्रारंभी ‘अनाम प्रेम परिवारा’च्या एका भक्ताने रुद्रवीणेवर पंचकाचे वादन केले. त्यानंतर मथुरा आणि बरसाना येथून आलेल्या ‘मान मंदिर सेवा संस्थान’च्या १६ गोपी, तसेच सनातनच्या साधिका संगीत विशारद कु. तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि सनातनच्या सूक्ष्मज्ञान प्राप्तकर्त्या साधिका कु. मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) यांचे गोपी या भावाने पूजन करण्यात आले. या वेळी ‘गोव्यातही श्रीकृष्णप्रिय गोपी आहेत’, असे आयोजकांनी कार्यक्रमात सांगितले. कु. तेजल पात्रीकर यांनी उपस्थितांना रासलीला आणि गोपींचे आध्यात्मिक महत्त्व थोडक्यात सांगितले. त्यानंतर कलियुगातील सनातनच्या ३ गोपींची श्रीकृष्णभक्तीची वैशिष्ट्ये, त्यांचे श्रीकृष्णाशी होत असलेले संवाद इत्यादी भाग एका चलचित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आला. यानंतर सनातनची दैवी बालसाधिका कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ५९ टक्के) हिने ‘जय जनार्दना…’ या श्रीकृष्ण गीतावर भरतनाट्यम् नृत्य भावपूर्णरित्या सादर केले.

रासलीला सादर करतांना बरसाना, उत्तरप्रदेश  येथील ‘मान मंदिर सेवा संस्थान’च्या गोपी
बसलेल्या डावीकडून कु. मधुरा भोसले आणि कु. तेजल पात्रीकर यांचे गोपीपूजन

या भावविभोर नृत्यानंतर बरसाना, उत्तरप्रदेश येथून आलेल्या ‘मान मंदिर सेवा संस्थान’च्या ३ गोपी आणि त्यांच्या समवेत आलेले शास्त्रीजी यांनी व्रजभूमीचे आणि श्रीकृष्णाच्या भक्तीचे माहात्म्य उपस्थितांना सांगितले. त्यानंतर रात्री १२.३० नंतर बरसाना येथून आलेल्या या गोपींपैकी काहींनी श्रीकृष्णावरील भजने म्हटली आणि त्यावर अन्य गोपींनी रासलीला नृत्य सादर केले. या रासलीलेत दोन गोपींनी अनुक्रमे राधा आणि श्रीकृष्ण यांचे रूप साकार केले होते. राधा-कृष्ण यांच्या लीलांवर आधारित विविध भजनांवर राधा-कृष्ण यांचे प्रसंग या रासलीलेमध्ये नृत्याच्या माध्यमातून साकारले गेले. या श्रीकृष्णावर आधारित भजनांना पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांनी त्यांच्या केशव वेणूच्या माध्यमातून वेणूनादाने (बासरीवादनाने) साथ दिली. त्यांना तबल्यावर सनातनचे साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी साथ केली. या कार्यक्रमात ‘अनाम प्रेम परिवारा’च्या सदस्यांच्या बालकांनी श्रीकृष्णाच्या विविध लीलांवर आधारित नाट्यछटा प्रस्तुत केल्या, तसेच यात श्रीकृष्ण-अर्जुन यांचा गीताकथन संवाद नाट्यरूपात दर्शवण्यात आला. ‘रासलीला’ कार्यक्रमानंतर कला अकादमी, गोवाचे बासरी विभागाचे प्रमुख श्री. सोनिक वेलिंगकर यांनी ‘चंद्रकंस’ राग बासरीवर सादर केला. त्यांना तबल्यावर श्री. गिरिजय प्रभुदेसाई यांनी साथ केली.

कार्यक्रमाच्या शेवटी पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे मधूर बासरीवादन झाले. बासरी वादनात त्यांनी आरंभी उत्तररात्रीचा ‘चंपाकली’ हा राग सादर केला. नंतर ‘माझे माहेर पंढरी…’ हे भजन वाजवून शेवट ‘जो भजे हरि को सदा…’ या भैरवीने केला. या वेळी पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांचे बासरीवादन ऐकून सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. त्यानंतर ‘अनाम प्रेम परिवारा’च्या साधकांनी श्री सद्गुरु अडाणेश्वर महाराज यांचे गुरुमाऊली अष्टक म्हणून कार्यक्रमाची सांगता केली.

या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. अमित देसाई यांनी केले.

आभार !

या कार्यक्रमात सनातनच्या साधकांना सहभागी करून घेतले, यासाठी प.पू. दादाजी यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते, तसेच ‘अनाम प्रेम परिवारा’च्या गोवा येथील सदस्या सौ. मीरा सामंत आणि कार्यकर्ते यांची सनातन संस्था आभारी आहे.’

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद (आध्यात्मिक पातळी  ६३ टक्के), रामनाथी, गोवा.

क्षणचित्रे

१. कु. अपाला औंधकर हिचे नृत्य चालू असतांना तिच्याकडून वातावरणात आनंदाचे आणि चैतन्याचे पुष्कळ प्रक्षेपण होत असल्याचे तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना जाणवले. तिच्या मुखावर असलेले भाव आणि  आनंददायी हावभाव ती दैवी बालिका असल्याची जाणीव करून देत होते.

२. पू. पंडित केशव गिंडे गुरुजी यांचे बासरीवादन चालू असतांना तेथे उपस्थित असलेल्या सनातनच्या साधकांचे ध्यान लागले आणि भाव जागृत झाला.

३. ‘अनाम प्रेम परिवारा’च्या साधकांनी सनातनच्या आश्रमाविषयी, साधकांविषयी जिज्ञासेने चौकशी केली. साधक सांगत असलेली सूत्रे ते जिज्ञासेने ऐकत होते आणि त्यांच्या शंकाचे निरसन करून घेत होते.

४. अनाम प्रेम परिवाराच्या साधकांनी, ‘सनातनच्या साधकांकडे पाहून शांत वाटते. सर्वांच्या चेहर्‍यावर दैवी आणि सात्त्विक भाव आहेत’, असे सांगितले.’

वैशिष्ट्यपूर्ण

अनाम प्रेम परिवाराचे गुरु प.पू. दादाजी (मुंबई) यांनी ‘रासलीला’ हा कार्यक्रम करण्यापूर्वी सनातन-निर्मित ‘रासलीला’ हा ग्रंथ आयोजकांना देऊन, त्यांना ‘याप्रमाणे कार्यक्रम करा’, असे सांगितले होते.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक