लक्षावधी हिंदूंची हत्या करून छत्रपती संभाजी महाराज यांनाही हालहाल करून मारणार्या औरंगजेबाचे नाव अजूनही शहराला देण्यात आले आहे, हे सर्व पक्षांतील लोकप्रतिनिधींना लज्जास्पद आहे. केवळ संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या वेळी संभाजीनगर नामांतराच्या विषयावरून राजकारण न करता ‘औरंगाबाद’चे ‘संभाजीनगर’ नामकरण त्वरित करावे, अशी सर्व हिंदूंची अपेक्षा आहे. – संपादक
संभाजीनगर – औरंगाबाद शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याचे सूत्र पुन्हा एकदा समोर आले आहे. राज्यशासनाच्या एका अध्यादेशात (जी.आर्.) ‘संभाजीनगर’ असा उल्लेख केल्याने वाद उफाळून आला आहे. ‘सरकारकडूनच असा उल्लेख करण्यात आल्याने सरकारकडून नामांतरासाठी हालचाली चालू करण्यात आल्या आहेत’, असे सांगण्यात येत आहे. ‘अध्यादेशात संभाजीनगरचा उल्लेख करून स्वाक्षरी करणार्या अधिकार्याने त्यागपत्र द्यावे अथवा त्याला बडतर्फ करण्यात यावे’, अशी मागणी ‘एम्.आय्.एम्.’चे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. (हिंदुद्वेषाची कावीळ झालेले ‘एम्.आय्.एम्.’चे लोकप्रतिनिधी आणखी दुसरी काय मागणी करू शकतात ? – संपादक)
राज्यशासनाने ‘राज्य जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदे’मध्ये उद्योजक राम भोगले यांची निमंत्रित सदस्य म्हणून निवड केली आहे. त्याचा अध्यादेश शासनाने काढला आहे. त्यामध्ये राम भोगले यांच्या नावासमोर ‘संभाजीनगर-औरंगाबाद’ असा उल्लेख केला आहे. त्यामुळे कागदोपत्री ‘संभाजीनगर’ असे नामकरण होते का ? हा प्रश्नच आहे.