‘फेसबूक’ला जिहादी आतंकवादी संघटना नव्हे, तर ‘सनातन संस्था’ वाटते धोकादायक !

पसार आतंकवादी झाकीर नाईक, विविध आतंकवादी कारवायांमध्ये हात असलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांचा मात्र सूचीत समावेश नाही !

  • ‘धोकादायक’ कुणाला म्हणावे ?, याचे मूलभूत निकषही फेसबूकला ठाऊक नाहीत, इतके फेसबूक बाळबोध नाही, तर हिंदूंच्या धार्मिक संस्थांची जाणीवपूर्वक अपकीर्ती करणे आणि त्यांचे धर्मकार्य रोखणे, यांसाठी फेसबूकने हे कृत्य केले आहे, हे लक्षात घ्या !- संपादक
  • फेसबूकने सनातन संस्थेला आतंकवादी संघटना, माओवादी संघटना आदींच्या पंक्तींत बसवून स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरीच उघड केली आहे !- संपादक

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘फेसबूक’ने जगभरातील ४ सहस्र धोकादायक व्यक्ती आणि संघटना यांची गोपनीय सूची बनवली असून त्यामध्ये ‘सनातन संस्थे’चे नाव आहे. ही सूची अमेरिकेतील ‘दी इंटरसेप्ट’ या वृत्त संघटनेने उघड केली आहे. या सूचीमध्ये भारतामधील सनातन संस्थेसह १० संघटनांची नावे आहेत. या सूचीत पसार आतंकवादी झाकीर नाईक आणि विविध आतंकवादी कारवायांमध्ये हात असलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ यांचा समावेश नाही. या सूचीमधील अधिकतर व्यक्ती आणि संघटना पश्चिम आणि दक्षिण आशिया, तसेच इस्लामी देशांतील आहेत. सशस्त्र सामाजिक संघटना आणि आतंकवादी यांच्या नावांचाही यामध्ये समावेश आहे. गेल्या वर्षी फेसबूकने ६०० सशस्त्र सामाजिक संघटनांची सूची सिद्ध करून त्यांच्याशी संबंधित अनुमाने २ सहस्र ४०० फेसबूक पाने आणि त्यांच्याकडून चालवले जाणारे १४ सहस्र २०० गट हटवले होते.

ही सूची सर्वसमावेशक नाही ! – फेसबूक

‘दी इंटरसेप्ट’ने सूची उघड केल्यानंतर तिच्या सत्यतेविषयी फेसबूककडून कोणतीही थेट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही. ‘आतंकवादविरोध आणि धोकादायक संस्था’ या विषयांचे धोरण ठरवणार्‍या फेसबूकच्या विभागाचे संचालक ब्रायन फिशमन यांनी ट्वीट करून म्हटले की, ही सूची सर्वसमावेशक नाही. फेसबूक अशी सूची सतत अद्ययावत करते. ही सूची फुटली आहे. याविषयी मी विशेषतः आमच्यावरील कायदेशीर बंधनांविषयी काही सूत्रे मांडू इच्छितो. मला काही त्रुटी सांगायच्या आहेत. आम्ही अशी सूची घोषित करत नाही. धोकादायक संस्थांना नियमांतून पळवाट काढण्याची संधी मिळू नये, त्यांना कायदेशीर चौकट आणि सुरक्षाविषयक धोक्यांना बगल देता येऊ नये, हाच यामागील उद्देश असतो. काळ्या सूचीतील व्यक्ती आणि संस्था यांची प्रशंसा, त्यांचे प्रतिनिधित्व अन् त्यांना पाठिंबा देणे आमच्या व्यासपिठावरून शक्य होऊ नये; म्हणून तशा मजकुरावर बंदी घातली जाते अन् त्यांच्याशी संबंधित काही पोस्ट प्रसारित झाल्यास मजकूर हटवला जातो.

‘दी इंटरसेप्ट’च्या वृत्तानुसार फेसबूकने अनुमाने १ सहस्र सशस्त्र गटांवर बंदी घातली आहे. ही सूची अमेरिकेच्या सरकारकडून घेण्यात आली. न्यूयॉर्कवरील आतंकवादी आक्रमणानंतर तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्लू. बुश यांच्या सरकारने निर्बंधांसाठी विशेष सूची सिद्ध केली होती. विशिष्ट कारणांसाठी ठरवण्यात आलेले ‘जागतिक आतंकवादी’ अशी संज्ञा त्यासाठी सिद्ध करण्यात आली आहे.

फेसबूकच्या सूचीतील भारतातील अन्य संस्थांची नावे

१. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी)

२. नागालँड राष्ट्रीय समाजवादी परिषद (इसाक-मुईवाह)

३. अखिल त्रिपुरा टायगर फोर्स

४. कांग्लैपॅक कम्युनिस्ट पक्ष

५. खलिस्तान टायगर फोर्स

६. पीपल्स रिव्होल्यूशनरी पार्टी ऑफ कांग्लैपॅक

७. इंडियन मुजाहिदीन

८. जैश-ए-महंमदशी संलग्न असलेला ‘अफजल गुरु स्क्वॅड’

९. इस्लामिक स्टेट आणि तालिबान यांना समर्थन देणारे विविध स्थानिक गट अन् उपगट (भारतासह इतर देशांतूनही सक्रीय)

(ही नावे वाचल्यानंतर यांच्या पंक्तीत सनातन संस्थेला बसवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करण्यात आला आहे, हे उघड होते. वरील बहुतेक संघटना भारतात बंदी घातलेल्या संघटना आहेत. कोणत्याही कायदाविरोधी कृत्यात सहभागी नसणार्‍या संस्थेला अपकीर्त करण्यासाठीच फेसबूक  प्रयत्नरत आहे, हे यातून स्पष्ट होते ! – संपादक)

पसार आतंकवादी डॉ. झाकीर नाईक नव्हे, तर सनातन संस्थेला धोकादायक मानणारे ‘फेसबूक’ हिंदुद्वेषीच ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

मुंबई – ‘डिसमेंटलींग ग्लोबल हिंदुत्व’ नावाची आंतरराष्ट्रीय ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात आली होती. यात हिंदु धर्माच्या विरोधात गरळ ओकण्यात आली आणि हिंदुत्वालाच आतंकवादाशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. यातूनच अमेरिकेमध्ये वाढत्या हिंदुत्वाच्या प्रभावाच्या विरोधात षड्यंत्र चालू असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम म्हणून हिंदु धर्माचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेला ‘धोकादायक’ ठरवण्याचा प्रयत्न ‘फेसबूक’सारख्या सामाजिक माध्यमाने केला आहे. प्रत्यक्षात याच फेसबूकवरून भारताने जिहादी आतंकवादी आणि धोकादायक ठरवलेल्या डॉ. झाकीर नाईक याची ५० हून अधिक अकाऊंट अहोरात्र प्रसार करत आहेत, ती मात्र फेसबूकला धोकादायक वाटत नाहीत. यातच फेसबूकची हिंदुद्वेषी भूमिका स्पष्ट होते, असे सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

श्री. राजहंस यांनी पुढे म्हटले की,

१. गेल्या आठवड्यातच फेसबूकचे माजी वैज्ञानिक फ्रान्सिस होगेन यांनी ‘फेसबूक हे लहान मुले आणि लोकशाही यांच्यासाठी धोकादायक आहे’, अशी साक्ष अमेरिकेच्या संसदेत दिली आहे. यापूर्वीही फेसबूकद्वारे नागरिकांची व्यक्तीगत माहिती उघड करण्याच्या आणि नागरिकांवर पाळत ठेवण्याच्या आरोपांवरून फेसबूकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांना अमेरिकेच्या संसदेत उभे करून जाब विचारण्यात आला होता. त्यामुळे अशा लोकशाहीला धोकादायक असणार्‍या फेसबूकसारख्या आस्थापनाच्या गोपनीय सूचीत कुणाचे नाव आहे, याला सनातनच्या दृष्टीने काडीमात्र महत्त्व नाही.

२. अमेरिकेमध्ये पद्धतशीरपणे हिंदुत्वाच्या विरोधात प्रचार करण्याचे षड्यंत्र चालू आहे. वर्ष २०१४ पूर्वी जवळपास ८ वर्षे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री असतांना अमेरिकेत येण्यास बंदी घातली होती. वर्ष २०१८ मध्ये ‘सी.आय.ए.’ या अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या सूचीत बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांना ‘आतंकवादी धार्मिक संघटना’ असे वर्गीकृत केले होते. आता फेसबूकच्या सूचीत सनातन संस्थेचे नाव येणे, हे ‘सनातन संस्था हिंदु धर्माचा प्रभावी प्रचार करते’, हेच सिद्ध करते.

जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ फेसबूकला धोकादायक वाटत नाही !

श्री. राजहंस म्हणाले की, भारतात आतंकवादी कारवायांत सहभागी असल्याचा आरोप असणारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) आणि तिच्या ४२ संलग्न संघटना फेसबूकला धोकादायक वाटत नाहीत; पण तेलंगाणाचे भाजप आमदार श्री. राजासिंह ठाकूर, हिंदुत्वाचा उघड पुरस्कार करणारे ‘सुदर्शन चॅनल’ आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्यरत असणारी हिंदु जनजागृती समिती यांची फेसबूक खाती धोकादायक वाटतात, हे अत्यंत निषेधार्ह आणि भेदभाव करणारे आहे.

सनातन संस्थेचे ‘फेसबूक’ला आव्हान !

‘फेसबूक’ने सनातन संस्थेची एक तरी पोस्ट आक्षेपार्ह किंवा समाजविघातक आहे, असे दाखवून द्यावे, असे आव्हान आम्ही देतो. सनातन संस्था भारतीय राज्यघटना आणि कायदे पाळून धर्मप्रसार करणारी एक आध्यात्मिक संस्था आहे. सनातनवर बंदी घालण्याच्या विरोधकांच्या मागणीवर ‘असा कोणताही प्रस्ताव नाही’, असा खुलासा भारत सरकारने वेळोवेळी केला आहे.

– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.