‘सोने’ या धातूप्रमाणे तेजतत्त्व कार्यरत असलेली आपट्याची पाने दसर्‍याच्या दिवशी एकमेकांना का देतात ?

कु. प्रियांका लोटलीकर

१. दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देण्यामागील कारणे

१ अ. मुळाशी आकृष्ट झालेल्या निर्गुण तेजोलहरी पानांमध्ये कार्यरत होत असणे : ‘आपट्याच्या झाडाच्या मुळाशी ब्रह्मांडातील निर्गुण तेजोलहरी आकृष्ट होऊन सामावून रहातात. तेजतत्त्वाचे अधिष्ठान लाभल्यामुळे कालांतराने त्या लहरी झाडाच्या पानांमध्ये कार्यरत होतात. या तेजोलहरी इच्छा-क्रिया शक्तीशी संबंधित असतात.

१ आ. आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्यांचे प्रमाण अधिक असणे आणि सूर्यकिरणांचा प्रभाव पडल्यावर त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होणे : अन्य वृक्षांच्या तुलनेमध्ये आपट्याच्या पानांमध्ये हरितद्रव्यांचे प्रमाण अधिक असते. ज्या वेळी या पानांवर सूर्यकिरण पडतात, त्या वेळी त्यांतील तेजतत्त्व कार्यान्वित होण्यास आरंभ होतो. ही पाने वाळली, तरी त्यांचा जो मूळ रंग असतो, त्यामध्ये अन्य वृक्षांच्या पानांच्या तुलनेत अधिक पालट होत नाही.

१ इ. पानांतून प्रक्षेपित होणार्‍या तेजोलहरींचे प्रक्षेपण होऊन त्यांचे वातावरणामध्ये दीर्घकाळ वास्तव्य असते.

१ ई. ‘सोन्याचे प्रतीकात्मक रूप’ म्हणून आपट्याच्या पानाचा वापर करण्यामागील कारण : ज्याप्रमाणे ‘सोने’ या धातूमध्ये तेजतत्त्वाची स्पंदने कार्यरत असतात, त्याप्रमाणे आपट्याच्या पानामध्येही अंशात्मक स्तरावर तेजतत्त्वाची स्पंदने कार्यरत असल्यामुळे ‘सोन्याचे प्रतीकात्मक रूप’ म्हणून या पानाचा वापर केला जातो.

२. दसरा आणि आपट्याचे पान

२ अ. दसर्‍याला ब्रह्मांडमंडलातून दैवी स्पंदने भूमंडलाकडे आकृष्ट होणे : दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे त्या दिवशी दैवी स्पंदने ब्रह्मांडमंडलातून भूमंडलाकडे अधिक प्रमाणात आकृष्ट होतात आणि भूमंडलावर कार्यरत रहातात.

२ आ. या दिवशी आपट्याच्या पानांमधील तेजतत्त्व अधिक प्रमाणात जागृत होत असल्याने आपट्याची पाने देण्याला विशेष महत्त्व आहे.

२ इ. आपट्याचे पान दिल्यामुळे त्याग आणि प्रीती वाढणे अन् ‘विजयाचा दिवस’ म्हणून आनंदोत्सव साजरा होणे : एकमेकांना आपट्याचे पान दिल्यामुळे दोघांमधील त्याग आणि प्रीती वाढते. आपट्याचे पान एकमेकांना देणे हे आपल्याकडील सोन्याप्रमाणे मौल्यवान वस्तू दुसर्‍याला देण्यासारखे आहे. दसरा हा ‘विजयाचा दिवस’ असल्यामुळे त्या दिवशी आपट्याचे मौल्यवान पान एकमेकांना देऊन आनंदोत्सव साजरा करण्यात येतो.

३. दसर्‍याच्या दिवशी आपट्याचे पान देणे, हे सौजन्यता, समृद्धता आणि संपन्नता दर्शवते.’

– कु. प्रियांका लोटलीकर (सध्याची आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), संशोधन समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

  • सूक्ष्म: व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’.  साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहे.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.