बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलवीकडून मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार !

असे वासनांध मौलवी असलेल्या मदरशांमधून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण मिळत असेल ? याचा विचारच न केलेला बरा ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे एका मौलवीने लग्नाचे आमीष दाखवत मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. उबैश हाफिज असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.


बहेडी येथील पीडित विद्यार्थिनी ४ वर्षांपूर्वी शीशगड क्षेत्रातील एका मदरशात शिकण्यासाठी गेली होती. त्याच मदरशामध्ये आरोपी उबैश हाफीज हाही शिकत होता, जो नंतर मौलवी बनून त्याच मदरशामध्ये शिकवण्याचे काम करू लागला. पोलिसांच्या माहितीप्रमाणे या काळात मौलवी आणि सदर विद्यार्थिनी एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर निकाह करण्याचे (लग्नाचे) आमीष देऊन मौलवीने विद्यार्थिनीवर अनेक वेळा बलात्कार केला. कालांतराने पीडिता गर्भवती राहिली. तेव्हा आरोपीने बलपूर्वक तिचा गर्भपात केला. या कालावधीत पीडिता तिच्या नातेवाइकांसह मौलवीच्या घरी गेली. तेव्हा मौलवीने तिला ठार मारण्याची धमकी देत पिटाळून लावले. त्यामुळे पीडितेने पोलीस तक्रार प्रविष्ट केली. या प्रकरणी पोलिसांनी हाफीज याच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.