चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वांना सामावून घ्या ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप

सिंधुदुर्ग विमानतळाचे प्रवेशद्वार

सावंतवाडी – चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे उद्घाटन हा जिल्हावासियांसाठी आनंदोत्सव आहे. या कार्यक्रमात स्थानिक सरपंचांना डावलणे दुर्दैवी आहे. त्यामुळे या कार्यक्रमात सर्वांना सामावून घ्या, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार राजन तेली यांनी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले.
या वेळी तेली म्हणाले, ‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही. शिवसेनेचे नेते या विमानतळाच्या उद्घाटनाची मोठ्या उत्साहात सिद्धता करत आहेत; मात्र या ठिकाणी आवश्यक असणार्‍या रस्ते, पाणी, वीज आदी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. उद्घाटनाचा कार्यक्रम जवळ आल्यावर विमानतळाकडे जाणार्‍या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू आहे, हे दुर्दैवी आहे. या प्रकल्पात भूमीपुत्रांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत. त्यांना न्याय मिळाला नाही, तर आम्ही आंदोलन करू.’’