नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण : प्रतिघंट्याला ७०० भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीचे ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शन होणार !

श्री महालक्ष्मीदेवीची अलंकार पूजा

कोल्हापूर, ६ ऑक्टोबर (वार्ता.) – साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील नवरात्रोत्सवाची सिद्धता पूर्ण झाली आहे. संपूर्ण मंदिरावर विद्युत् रोषणाई करण्यात आली आहे. पुरुष आणि महिला भाविक यांच्यासाठी दोन स्वतंत्र रांगा असून मंदिरात साडी, ओटी, नारळ, तेल, पूजेचे साहित्य किंवा अन्य कोणतेही साहित्य घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

श्री महालक्ष्मी देवीची पहाटे करण्यात आलेली काकडा पूजा

प्रतिघंट्याला ७०० भाविकांनाच ‘ई-दर्शन पास’द्वारे दर्शन घेता येणार आहे. नवरात्रीत ९ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात अलंकारिक पूजा बांधण्यात येते. ६ ऑक्टोबर या दिवशी देवीची अलंकार पूजा बांधण्यात आली होती.

श्री महालक्ष्मी मंदिरावर करण्यात आलेली विद्युत् रोषणाई

प्रत्येक वर्षी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८.३० वाजता श्री महालक्ष्मीदेवीची महापूजा झाल्यावर गाभार्‍यात घटस्थापना केली जाते. या वेळी श्री महालक्ष्मीदेवीची उत्सवमूर्ती सनईच्या गजरात घटाच्या शेजारी विराजमान होते आणि नवरात्रोत्सवास प्रारंभ होतो. गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे नवरात्रीत मंदिर बंद होते. यंदा नवरात्रीत मंदिर खुले झाल्याने भाविकांना श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे.