ग्वादर (पाकिस्तान) येथे बलुच संघटनेकडून महंमद अली जिना यांचा पुतळा स्फोटकांद्वारे उद्ध्वस्त

पाककडून बलुची लोकांवर गेली ७४ वर्षे होत असलेला अत्याचार पहाता ही घटना फारच छोटी आहे; मात्र त्यातून जगाला या लोकांवरील अत्याचारांची दखल घ्यावी लागेल ! – संपादक

ग्वादर (पाकिस्तान) – पाकच्या बलुचिस्तान प्रांतातील ग्वादर शहरामध्ये बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पाकचे संस्थापक महंमद अली जिना यांचा पुतळा बाँबने उद्ध्वस्त केला. येथील समुद्रकिनार्‍यावर हा पुतळा होता. याचवर्षी जून मासामध्ये हा पुतळा येथे बसवण्यात आला होता. या पुतळ्याचे आधीचे आणि स्फोटानंतर उद्ध्वस्त झालेले छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आलेल्या बलोच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बबगर बलोच यांनी ट्वीट करून या स्फोटाचे दायित्व स्वीकारले आहे.

१. ग्वादरचे उपायुक्त मेजर (सेवानिवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या माहितीनुसार या प्रकरणाची चौकशी एक उच्चस्तरीय समिती करत आहे. ते म्हणाले की, जिना यांचा पुतळा पाडणारे लोक पर्यटक म्हणून या परिसरामध्ये शिरले होते. या प्रकरणामध्ये अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही; मात्र लवकरच चौकशी पूर्ण केली जाईल.

२. बलुचिस्तानला स्वातंत्र्य द्यावे आणि या भागामधील नागरिकांवर चालू असणारे अत्याचार थांबावेत; म्हणून प्रस्थापित सरकारविरोधात बलुची लोक संघर्ष करत आहेत. त्यातूनच त्यांनी हा पुतळा उद्ध्वस्त केल्याचे सांगितले जात आहे.