वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे, तसेच फिरत्या हौदात विसर्जन करणे भाग पडले !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या नियोजनाचा पुणे महापालिकेचा बोजवारा ! – संपादक 

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, २० सप्टेंबर – पुणे शहर, उपनगर आणि ग्रामीण भागांत श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी महापालिकेच्या नियोजनाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून ठिकठिकाणी विसर्जन केंद्रांवर तुडुंब गर्दी दिसून आली. अधिकाधिक भाविकांचा वहात्या पाण्यात विसर्जन करण्याकडे कल दिसून येत होता; मात्र वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांना श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रात देणे भाग पडले. कुणालाही शहरात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी अनुमती दिलेली नसल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्री गणेशमूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन झाले, तर घरगुती श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठीही फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, तसेच महापालिकेच्या वतीने अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात आले. (फिरते हौद, मूर्ती संकलन केंद्र, तसेच अमोनियम बायकार्बोनेट यांसारख्या अशास्त्रीय गोष्टींवर लाखो रुपयांचा व्यय करण्यापेक्षा महापालिकेने कोरोनाचे नियम पाळून वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती दिली असती, तर श्री गणेशाची होणारी विटंबना रोखता आली असती. – संपादक)

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे येथील जुन्नर जिल्ह्यात १०० टक्के श्री गणेशमूर्तींचे धर्मशास्त्राप्रमाणे वहात्या पाण्यात विसर्जन !

आदर्श गणेशोत्सवाचे आणि वहात्या पाण्यात विसर्जन करण्याचे महत्त्व सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घरोघरी जाऊन विषद केले होते, तसेच सामाजिक माध्यमांतूनही मूर्तिकार, मूर्तीविक्रेते यांचे प्रबोधन केले होते. या पार्श्वभूमीवर जुन्नर शहर आणि आजूबाजूच्या वाडीवस्तीवरील दुसर्‍या, पाचव्या, सातव्या आणि शेवटच्या दिवशीच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन गणेशभक्तांनी वहात्या पाण्यातच केले.

धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करणे योग्य असल्याने परदेशपुरा येथील रहिवासी यांनी एकत्रित येऊन पाताळेश्वर पानोठ्यावर विसर्जन केले, असे परदेशपुरा येथील गणेशभक्त श्री. प्रमोद परदेशी, श्री. अक्षय भागवत आणि श्री. शिवाजी डोके यांनी सांगितले.