पितरपूजन आणि तर्पणविधी या विधींतून निर्माण झालेल्या चैतन्याचा विधी करणार्‍या संतांवर झालेला सकारात्मक परिणाम

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

श्राद्धविधींविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

‘संपूर्ण पृथ्वीवरील देवपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे देवलोकात स्थान प्राप्त केलेले जीव), ऋषिपितर (मनुष्यजन्माला येऊन मृत्यूनंतर साधनेद्वारे ऋषिलोकात स्थान प्राप्त केलेले जीव) आणि मनुष्यपितर, सनातनचे दिवंगत साधक, तसेच सर्व साधकांचे पूर्वज यांना मुक्ती लाभावी, यासाठी सद्गुरु (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पितरपूजन करावे’, असे भृगु महर्षींनी चेन्नई येथील नाडीपट्टी वाचनाद्वारे सांगितले होते. त्यानुसार १९.२.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सद्गुरुद्वयींनी पितरपूजनाचा संकल्प केला. त्यानंतर सप्तनद्यांचे जल कलशात भरून त्यात देवपितर, ऋषिपितर आणि मनुष्यपितर यांचे आवाहन अन् षोडशोपचार पूजन केले. सनातनचे संत पू. पृथ्वीराज हजारे यांनी तर्पणविधी केला. ‘पितरपूजन विधीचा सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु  (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यावर, तसेच तर्पणविधीचा पू. पृथ्वीराज हजारे यांच्यावर आध्यात्मिक स्तरावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

टीप – हा लेख महर्षींनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांचे नामकरण ‘श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ’ अन् ‘श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ’ असे करण्यापूर्वीचा असल्याने लेखात त्यांचा उल्लेख ‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ’ अन् ‘सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ’ असा केला आहे.

यू.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. रूपेश रेडकर

१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन

या चाचणीत सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पितरपूजन करण्यापूर्वी अन् केल्यानंतर, तसेच पू. पृथ्वीराज हजारे यांनी तर्पणविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर त्यांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

१ अ. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ, सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ आणि पू. पृथ्वीराज हजारे यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ
श्रीचित्‌शक्‍ति सौ. अंजली मुकुल गाडगीळ
पू. पृथ्वीराज हजारे

१ आ. पितरपूजनानंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यामध्ये आरंभीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. पितरपूजनानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ प्रमाणात वाढली. हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.

पितरांसाठी तर्पण करतांना पू. पृथ्वीराज हजारे 

१ इ. तर्पणविधीच्या नंतर पू. पृथ्वीराज हजारे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ प्रमाणात वाढ होणे : पू. पृथ्वीराज हजारे यांच्यामध्ये आरंभीही (तर्पणविधीपूर्वी) पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती. तिची प्रभावळ ३२.०२ मीटर होती. तर्पणविधीनंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत ३०.९८ मीटर वाढ होऊन ती ६३ मीटर झाली.

२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

२ अ. माघ पौर्णिमेला आलेल्या मघा नक्षत्रावर पितरपूजन करण्याचा दुर्मिळ योग ! : पितरपूजनाच्या वेळी मघा नक्षत्र होते. मघा नक्षत्रावर श्राद्धविधी करतात. माघ पौर्णिमेला क्वचित् मघा नक्षत्र असते. या वेळी हा दुर्मिळ योग जुळून आला होता. त्यामुळे आजची तिथी पितरपूजनासाठी योग्य असून हे महर्षींनी सहस्रो वर्षांपूर्वीच लिहून ठेवले आहे, यावरून महर्षींचे श्रेष्ठत्व लक्षात येते. ‘अवतार अनेक जिवांचा उद्धार करतात. श्रीरामावतारात आणि श्रीकृष्णावतारात भगवंताने विभिन्न योनींत अडकलेले देवगण, ऋषिगण यांना मुक्त केले. १९ फेब्रुवारीचा माघ पौर्णिमेचा दिवसही असाच आहे’, असे पितरपूजनाविषयी महर्षि भृगु यांनी म्हटले आहे.

२ आ. हिंदु धर्मातील सिद्धान्तानुसार ईश्वरप्राप्तीसाठी देवऋण, ऋषिऋण, समाजऋण आणि पितरऋण फेडावे लागते. श्रीगुरूंच्या कृपेने या चारही ऋणांतून मुक्त होता येते. ‘महर्षि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पार पडलेल्या पितरपूजनाने सनातनच्या सर्व साधकांच्या पूर्वजांना मुक्ती लाभणार आहे’, असा महर्षींचा संकल्प आहे.

२ इ. पितरपूजन आणि तर्पणविधी या दोन्ही विधींच्या वेळी वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण होणे : पितरपूजन आणि तर्पणविधी हे भृगु महर्षींच्या आज्ञेने करण्यात आले. या विधींमागे त्यांचा संकल्प कार्यरत होता. सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी पितरपूजन आणि पू. पृथ्वीराज हजारे यांनी तर्पणविधी हे अत्यंत भावपूर्ण केले. यामुळे दोन्ही विधींच्या वेळी वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य निर्माण झाले.

२ ई. तिन्ही संतांनी कार्याच्या आवश्यकतेनुसार त्या त्या विधीतील चैतन्य ग्रहण करणे : पितरपूजन आणि तर्पणविधी या विधींतून निर्माण झालेले चैतन्य संतांनी त्यांच्या कार्याच्या आवश्यकतेनुसार ग्रहण केले. त्यामुळे पितरपूजन विधीनंतर सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील अन् तर्पणविधीनंतर पू. पृथ्वीराज हजारे यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे चाचणीतून दिसून आले.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी दुर्गेश सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (७.३.२०१९)

ई-मेल : [email protected]

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.