याचिकाकर्त्याला १० सहस्र रुपयांचा दंड; द्वेषभावनेतून याचिका प्रविष्ट !
नागपूर – शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानच्या ६५० एकर जागेत वसलेल्या ‘आनंदसागर’ या प्रेक्षणीय स्थळाच्या विरोधात प्रविष्ट केलेली याचिका येथील खंडपिठाने निकाली काढून याचिकाकर्ता अशोक गारमोडे यांना १० सहस्र रुपयांचा दंड दिला आहे. गारमोडे यांनी शेगाव संस्थानविरुद्ध द्वेषभावनेतून याचिका प्रविष्ट केल्यामुळे न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी ही याचिका १६ सप्टेंबर या दिवशी निकाली काढली आहे.
अशोक गारमोडे हे संस्थानमध्ये सेवेकरी होते. त्यांना संस्थेच्या दुसर्या ठिकाणी सेवा करण्यास सांगण्यात आले होते. त्यांना हे मान्य नसल्याने त्यांनी याविरुद्ध औद्योगिक न्यायालयात तक्रार प्रविष्ट केली होती. ‘याचिकाकर्त्याने न्यायालयात केलेली तक्रार अनधिकृत असून ते संस्थानचे कर्मचारी नाहीत, तर एक सेवेकरी होते’, असे कारण सांगून औद्योगिक न्यायालयाने त्यांची याचिका खारीज केली होती.
यानंतर अशोक गारमोडे यांनी वर्ष २०१९ मध्ये उच्च न्यायालयात आनंदसागर आणि त्याचे सौंदर्यीकरण यांच्या विरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने संस्थानला नोटीस बजावली होती. नंतर संस्थानने नगरपालिकेतून या प्रकरणाची प्रत घेऊन संस्थानला प्रतिवादी करावे, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०२० मध्ये संस्थानचा अर्ज मान्य केला होता; मात्र उच्च न्यायालयाने अशोक गारमोडे यांना याचिकेत सुधारणा करण्याचे आदेश दिले होते; परंतु त्यांनी याकडे दुर्लक्ष केले होते, तसेच सुनावणीच्या वेळी गारमोडे अनुपस्थित राहिले होते. संस्थानने उच्च न्यायालयात उत्तर प्रविष्ट केले. त्यानंतर झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढून वरील निर्णय दिला.