गंगापूर (जिल्हा संभाजीनगर) – धावत्या एस्.टी.चे ‘स्टेअरिंग’ लहान मुलाच्या हातात दिल्याप्रकरणी एस्.टी. महामंडळाचे वरिष्ठ साहाय्यक अधिकारी अ.व. आहिरे यांनी गंगापूर राज्य परिवहन आगारातील एस्.टी. चालक आर्.बी. शेवाळकर यांना निलंबित केले आहे. ‘प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता असा प्रकार कोणत्याही चालकाने करू नये’, अशी सूचनाही अहिरे यांनी केली आहे. गंगापूर-उदगीर प्रवासाच्या वेळी एस्.टी. चालक आर्.बी. शेवाळकर यांनी एस्.टी.त रडणार्या मुलाला शांत करण्यासाठी त्याच्या हातात एस्.टी.चे ‘स्टेअरिंग’ दिले होते. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर नागरिकांनी एस्.टी. महामंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. एस्.टी.चे ‘स्टेअरिंग’ लहान मुलाच्या हातात दिल्याने प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.