भाजपचे गोव्यातील निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांचा २० सप्टेंबर या दिवशी गोव्यात दौरा

श्री. देवेंद्र फडणवीस

पणजी, १४ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे गोव्यासाठी नियुक्त करण्यात आलेले निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, संस्कृती अन् पर्यटन खात्याचे केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी आणि रेल्वे अन् टेक्सटाईल खात्याच्या केंद्रीय मंत्री दर्शना जरदोश २० सप्टेंबर २०२१ या दिवशी गोव्यात येणार आहेत. या वेळी भाजपमधील स्थानिक निवडक कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी आगामी विधानसभा निवडणुकीविषयी पक्षाचे धोरण ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘देवेंद्र फडणवीस यांना अनेक निवडणुकांचा अनुभव असून त्याचा लाभ गोव्यातील भाजपला होईल.’’ ‘काही प्रसिद्ध नेते काँग्रेसमध्ये जाण्याच्या विचारात आहेत’, असे लक्षात आणून दिल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘कोण कुठल्या राजकीय पक्षात जातो, हे महत्त्वाचे नाही. लोक उमेदवारी मिळवण्यासाठी दुसर्‍या पक्षात जाऊ शकतात. आम्ही बहुसंख्य मतांनी जिंकून येणे, हे महत्त्वाचे आहे.’’