संपादकीय
‘अॅमेझॉन’ सारख्या हिंदुद्वेषी आस्थापनांवर भारतात तात्काळ बंदी आणायला हवी ! – संपादक
गणेशोत्सवाची चाहूल लागताच ‘इको फ्रेंडली’ची टूम डोके वर काढते की, जी अन्य धर्मियांच्या वेळी गायब होते. असाच भाग यंदाच्या वर्षीही वस्तूंची ‘ऑनलाईन’ विक्री करणार्या संकेतस्थळांच्या संदर्भातही दिसून आला. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती प्रचंड प्रदूषणकारी आणि पर्यावरणास घातक असल्याने त्यावर बंदी घालण्याचा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने यापूर्वीच दिला आहे. असे असतांनाही ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांवर (‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, ‘इंडिया मार्ट’, ‘इको गणेशा’ यांसारख्या संकेतस्थळांवर) कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. खरेतर हिंदु धर्मशास्त्रानुसार श्री गणेशाची मूर्ती ही शाडू मातीची असली पाहिजे, तरच तिच्यामध्ये देवत्व येऊन त्याचा भाविकांना लाभ होतो. गणपति हे कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत आहे. गणेशोत्सवात धर्मशास्त्रानुसार आणि भक्तीयुक्त अर्चना केल्याने श्री गणेशाची भाविकावर कृपा होते. असे असतांना कोट्यवधी हिंदूंना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे, हा एक प्रकारे हिंदुद्वेषच आहे. त्यामुळे हिंदूंची दिशाभूल करणार्या अशा संकेतस्थळांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय हरित लवादाचा अवमान केल्याप्रकरणी गुन्हे नोंद व्हायला हवेत.
‘अॅमेझॉन’सारख्या आस्थापनांची हिंदुद्वेषी पार्श्वभूमी !
सध्या ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांची लोकप्रियता अधिक आहे. दळणवळण बंदीच्या काळात तर ती अजूनच वाढली आहे. यातील ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’, यांसारख्या बहुतांश संकेतस्थळांवर विदेशी आस्थापनांचे वर्चस्व आहे. ‘अॅमेझॉन’वर यापूर्वी श्री गणपतीचे चित्र असलेली चप्पल विक्रीसाठी ठेवून श्री गणेशाचा अवमान करण्यात आला होता. ‘ॐ’सारखी हिंदूंची धर्मचिन्हे आणि प्रतिके असलेले पायपोस, अंतर्वस्त्रे यांची विक्री करून एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे ‘अॅमेझॉन’कडून वारंवार हिंदु देवतांना न्यून लेखण्याचा प्रकार केला जातो. ‘अॅमेझॉन’ आणि ‘फ्लिपकार्ट’ विक्री करत असलेल्या अशा उत्पादनांमुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. वेब सिरीज, पुस्तके यांच्या माध्यमातूनही ‘अॅमेझॉन’ त्याचा हिंदुद्वेष पाजळत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ‘अॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या संकेतस्थळांवर भारतीय राष्ट्रध्वजाचे ‘मास्क’ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. ‘अॅमेझॉन’ने त्याच्या ‘अॅप’मध्ये मराठी भाषा समाविष्ट करण्यासाठी ‘का-कू’ केली होती. थोडक्यात हिंदुद्वेषाने आणि भारतद्वेषाने ओतप्रोत भरलेली ‘अॅमेझॉन’सारखी विदेशी आस्थापने बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या देशात पद्धतशीरपणे पाय रोवून उभी आहेत.
वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे.
विद्वेषी नियंत्रण हटवा !
भारतात हिंदूंच्या धार्मिक आणि राष्ट्रीय भावना दुखावणार्या उत्पादनांना थारा दिला जातो; म्हणून ‘अॅमेझॉन’सारख्या आस्थापनांचे फावते. हिंदुविरोधी आस्थापनांनी कधी अन्य धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस केलेले नाही. त्यामुळे हिंदूंनी संघटितपणे हिंदुविरोधी उत्पादनांवर बहिष्कार घातला, तर अशी आस्थापने वठणीवर येऊ शकतात. यात सरकारी पातळीवरील भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. राष्ट्रीय हरित लवादाने कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींवर बंदी आणण्याविषयी दिलेल्या न्यायिक निर्णयाला प्रशासनाने कार्यवाही आणि कारवाई या दोन्ही स्तरांवर निष्प्राण केले आहे. केवळ याच निर्णयाविषयी नाही, तर अन्य निर्णयांचीही ठोस कार्यवाही होतांना दिसत नाही, असाच कटू अनुभव हिंदुत्वनिष्ठांना येतो. त्यामुळे सरकारने कायद्याची प्रभावी कार्यवाही न करणार्या प्रशासनावर पर्यायाने अधिकार्यांवर वेळोवेळी कठोर कारवाई केली, तरच राजरोसपणे चालणार्या हिंदुद्रोही कारभाराला आळा बसू शकतो.
विदेशी आस्थापनांना हिंदूंचा अवमान करण्यासाठी मोकळे रान मिळते, हा खुल्या बाजारीकरणाचा एक दुष्परिणाम आहे. काही प्रथितयश ‘ई कॉमर्स’ संकेतस्थळांचे संस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी हे भारतीय आणि विशेष म्हणजे हिंदू आहेत. आज विदेशातील प्रगत म्हणवणार्या तंत्रज्ञानाचे जनक भारतीय आहेत. अनेक विदेशी आस्थापनांचा पाया भारतियांचे बुद्धीचातुर्य अन् कर्मकौशल्य यांवर आधारित आहे. असे असतांना ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांवर संपूर्णत: भारतियांचे नियंत्रण का येऊ शकत नाही ? राष्ट्रप्रेमी आणि आणि हिंदुहितकारी भावना असणार्यांचे भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण असायला हवे. ‘ई-कॉमर्स’ संकेतस्थळांवर कागदी लगद्याच्या धर्मशास्त्रविरोधी आणि प्रदूषणकारी नव्हे, तर धर्मशास्त्रसंमत अन् पर्यावरणपूरक अशा शाडू मातीच्या मूर्तींची विक्री व्हायला हवी. यासाठी उद्योजकांनी तर पुढाकार घ्यायलाच हवा, तसेच सरकारनेही यासाठी प्रयत्न करायला हवेत. शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांना अनुदान देण्यासह ती मूर्ती भाविकांनी घ्यावी, यासाठी प्रोत्साहन देणे आणि त्याविषयी जागृतीपर उपक्रम राबवायला हवेत. कागदी लगद्याच्या श्री गणेशमूर्तींचा प्रचार करणार्यांवर तत्परतेने कठोर कायदेशीर कारवाई करायला हवी. हिंदु देवता आणि राष्ट्रीय प्रतिके यांचे कुणीही विडंबन करू धजावणार नाही, अशी पत सरकारने निर्माण करायला हवी. हिंदुविरोधी कृत्ये केल्यानंतर ‘अॅमेझॉन’कडून क्षमा मागितली जाते; परंतु त्यांच्या मूळ हिंदुद्वेषी वृत्तीत पालट झालेला दिसत नाही. यातून ‘अॅमेझॉन’ला समंजसपणाची भाषा समजत नाही, हे वारंवार समोर आले आहे. खरेतर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘भारतात हिंदुविरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत’, असा धाक निर्माण करायला हवा. ‘नाक दाबल्याविना तोंड उघडत नाही’, हे लक्षात घेऊन ‘अॅमेझॉन’सारख्या आस्थापनांना धडा शिकवण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्यावर तात्काळ बंदी घालायला हवी, तसेच या आस्थापनांसमवेतचे सर्व करार रहित करायला हवेत. यासाठी हिंदूंनी सरकारवर दबाव आणायला हवा. आज हिंदु धर्मासाठी दिवसरात्र वैर्याची आहे, हे लक्षात घ्यायला हवे !