गेली ११ वर्षे शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती सिद्ध करून घेऊन त्या वितरित करणारे मिरज येथील नितीन कुलकर्णी !

श्री. नितीन कुलकर्णी वितरित करत असलेल्या सात्त्विक श्री गणेशमूर्ती

मिरज, १० सप्टेंबर (वार्ता.) – मिरज येथील श्री. नितीन कुलकर्णी हे गेली ११ वर्षे श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार आणि सनातनच्या सात्त्विक गणेश चित्राप्रमाणे सिद्ध करून घेऊन त्या वितरित करत आहेत. या मूर्ती शाडू मातीच्या असून त्या नैसर्गिक रंगात रंगवलेल्या आहेत. गेली दोन वर्षे कोरोना संसर्गाची पार्श्‍वभूमी असूनही श्री. कुलकर्णी यांना भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

या संदर्भात अधिक माहिती देतांना श्री. नितीन कुलकर्णी म्हणाले, ‘‘केवळ सांगली-कोल्हापूरच नाही, तर सोलापूर जिल्ह्यातूनही भाविकांची मूर्तीसाठी मागणी आहे. सनातन प्रभातच्या वाचकांची यात प्रामुख्याने मागणी आहे. मिरज येथील स्टेट बँकेतही आता प्रतिवर्षी आमच्याकडील मूर्तीची स्थापना करतात. मूर्ती समवेत अनेक भाविक सनातन निर्मित सात्त्विक उत्पादनेही नेतात. मूर्ती घरी नेल्यावर आनंद वाटणे, शांत वाटणे, घरात प्रसन्नता वाटणे यांसह अन्यही अनुभूती भाविकांना येतात.’’

श्री. नितीन कुलकर्णी

घरातील सर्व कोरोनाबाधित असूनही मूर्तीकार कोरोनाबाधित न होणे आणि मूर्तीची सेवा निर्विघ्नपणे पार पडणे !

यंदा गणेशमूर्ती सिद्ध करतांना श्री गणेशमूर्ती सिद्ध करणारे मूर्तीकार श्री. राजेंद्र कुंभार यांच्या घरातील सर्वजण कोरोनाबाधित होते. या सर्वांच्या संपर्कात राहूनही श्री. राजेंद्र यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही, तसेच ते या काळात स्थिर होते. या कालावधीतही कोणत्याही प्रकारचा ताण न येता ते वेळेत श्री गणेशमूर्ती सिद्ध करू शकले, ही त्यांच्यासाठी मोठी अनुभूती होती, असे श्री. राजेंद्र कुंभार यांनी सांगितले.