अयोद्धेतील दीपोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – दिवाळीच्या निमित्ताने प्रभु श्रीरामाच्या अयोध्येत उत्तरप्रदेश सरकारच्या वतीने दीपोत्सव साजरा केला जातो. यावर्षी दीपोत्सवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे हा दीपोत्सव भव्य होण्याची शक्यता आहे.


वर्ष २०१७ मध्ये उत्तरप्रदेशच्या योगी सरकारने दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला प्रारंभ केला होता. त्यामुळे अयोध्येतील हा ५ वा दीपोत्सव असणार आहे. या दीपोत्सवामध्ये ७ सहस्र ५०० स्वयंसेवकांच्या साहाय्याने ७ लाख ५० सहस्र दीप प्रज्वलित केले जाणार आहेत, अशी माहिती अयोध्या महानगरपालिकेचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनी दिली आहे.

अयोध्येत दीपोत्सवाचा कार्यक्रम धनत्रयोदशीच्या दिवशी; म्हणजे २ नोव्हेंबर या दिवशी चालू होईल. त्यामुळे याच दिवशी पंतप्रधान अयोध्येत येण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे अयोध्येतील दीपोत्सवाच्या कार्यक्रमाला राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तरप्रदेश सरकारमधील अनेक मंत्रीही उपस्थित असणार आहेत.