हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा सराव करतांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या कु. रेणुका कुलकर्णी यांनी भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यामुळे त्यांना जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमातील कु. रेणुका कुलकर्णी यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय गायनाचा ३ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. तसेच गेल्या ४ मासांपासून त्या शास्त्रीय गायनाचा सराव करत आहेत. या सरावाच्या वेळी त्यांना झालेले अनिष्ट शक्तींचे त्रास, त्यावर मात करतांना त्यांनी केलेले विविध प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती यांविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. रेणुका कुलकर्णी

१. शास्त्रीय गायनाच्या सरावाच्या वेळी झालेले आध्यात्मिक त्रास

१ अ. पूर्वी गायनाच्या सरावाचा विचार मनात आला, तरी पुष्कळ भीती वाटून ‘सरावाला जाऊ नये’, असे वाटणे : पूर्वी माझ्या मनात गायनाच्या सरावाचा विचार जरी आला, तरी आध्यात्मिक त्रासामुळे मला पुष्कळ भीती वाटायची. मला त्रास देण्यार्‍या अनिष्ट शक्तीला स्वरांमधील शक्ती सहन होत नव्हती. ‘प्रत्येक स्वर शस्त्राप्रमाणे कार्य करतो’, असे मला वाटते. त्यामुळे त्या वेळी ‘गायनाच्या सरावाला जाऊ नये’, असे नकारात्मक विचार माझ्या मनात यायचे.

(‘भारतीय शास्त्रीय संगीत हे दैवी असून त्यात दैवी शक्ती आहे’, हेच यावरून सिद्ध होते.’ – संकलक)

१ आ. गायन अपेक्षित पट्टीला अनुसरून न होता वेगळ्याच पट्टीत चालू होणे : मी ‘काळी ५’ या पट्टीमध्ये (व्यक्तीच्या आवाजाची उंची) गाते. बर्‍याचदा सरावाच्या वेळी मी ‘काळी ५’ या पट्टीचा सा (षड्ज) लावला, तर मला ती पट्टीच कळायची नाही. आध्यात्मिक त्रासामुळे माझ्या शरिराभोवती निर्माण झालेल्या त्रासदायक शक्तीच्या दाट आवरणामुळे ‘गाण्याची पट्टी कोणती आहे ?’, हे मला समजायचे नाही. त्यामुळे माझे गायन अपेक्षित पट्टीला अनुसरून चालू न होता वेगळ्याच पट्टीला अनुसरून चालू व्हायचे.

२. शास्त्रीय गायनाचा सराव करतांना केलेले भाववृद्धीसाठी प्रयत्न

२ अ. सरावाच्या वेळी ‘नटराजासमोर गात आहे’, असा भाव ठेवल्यामुळे गाण्यातील चुका सहज लक्षात येऊन त्या सुधारता येणे : मी सराव करतांना अलंकार, ताना, आलाप, तसेच विविध राग (टीप) यांचा अभ्यास करते. त्या वेळी मी ‘संगीताचे आराध्य दैवत नटराजासमोर गात आहे’, असा भाव ठेवते. सराव करतांना ‘भगवान शिव मला शिकवत आहे आणि गाण्यातील चुका दाखवत आहे’, असे मला जाणवते. त्यामुळे सरावाच्या वेळी काही चुकल्यास ते माझ्या लक्षात येऊन मला त्यात सुधारणा करता येते.

२ आ. सरावापूर्वी १० मिनिटे शरिराभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण काढून भाववृद्धीसाठी प्रयोग केल्याने आध्यात्मिक त्रास उणावणे : संगीत ही आकाशतत्त्वाची साधना असल्याने आणि मला आध्यात्मिक त्रास होत असल्याने गायनाच्या सरावाच्या वेळी अनिष्ट शक्तीला त्यातील चैतन्याचा त्रास होतो. तो रोखण्यासाठी मी सरावापूर्वी १० मिनिटे आधी माझ्या शरिराभोवती असलेले त्रासदायक शक्तीचे आवरण काढते आणि त्यानंतर भाववृद्धीसाठी १-२ मिनिटांचा भावप्रयोग करते. असे केल्याने ‘माझा आध्यात्मिक त्रास उणावतो आणि मला गाण्यामुळे होणारा सकारात्मक परिणाम अनुभवता येतो’, असे माझ्या लक्षात आले.

२ इ. ‘प्रत्येक आलाप अथवा तान देवाच्या चरणी अर्पण होत आहे’, असा भाव ठेवल्यामुळे शरणागती वाढण्यास साहाय्य होणे : मी प्रत्येक आलाप अथवा तान गातांना ‘ती तान अथवा आलाप देवाच्या चरणी अर्पण होत आहे’, असा भाव ठेवते. त्यामुळे ‘मला चांगले जमले’, असा अहंयुक्त विचार माझ्या मनात आला, तर त्याच क्षणी ‘हा विचार अयोग्य असून मी चुकले’, याची मला जाणीव होते. त्यामुळे मला भगवंताप्रती शरणागती वाढण्यास साहाय्य होते.

३. भाववृद्धीसाठी प्रयत्न केल्यामुळे झालेले पालट

३ अ. सराव करतांना मनात येणार्‍या नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष करता येणे : पूर्वी गायनाचा सराव चालू केल्यावर ‘सराव करू नये, मला संगीत आवडत नाही’, असे तीव्र नकारात्मक विचार माझ्या मनात यायचे. आता तसे विचार माझ्या मनात येत नाहीत. कधी आलेच, तरी त्यांची तीव्रता अल्प असते. मला त्या विचारांकडे तटस्थपणे पहाता येऊन दुर्लक्ष करता येते.

३ आ. उत्तरदायी साधिकेने सांगितल्याप्रमाणे खालच्या पट्टीत गायला प्रारंभ केल्यावर गायनातून आनंद मिळणे आणि प.पू. देवबाबा यांच्या बोलांचे स्मरण होणे : मी पूर्वी ‘काळी ५’ या पट्टीत (व्यक्तीच्या आवाजाची उंची) गायन करायचे. माझे गायन ऐकून मला उत्तरदायी साधिकेने एक श्रृती खाली, म्हणजे थोडे खालच्या पट्टीत गायन करण्यास सांगितले. प्रारंभी मला ते स्वीकारता आले नाही. नंतर खालच्या पट्टीत सराव चालू केल्यावर ‘स्वर अंतरंगातून निघत आहेत’, असे मला जाणवले आणि गायनातून पुष्कळ आनंद मिळाला. त्या वेळी मला कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांच्या ‘वरच्या स्वरांपेक्षा खालच्या स्वरांमध्ये अधिक सात्त्विकता असते’, अशा आशयाच्या बोलांचे स्मरण झाले.

३ इ. पूर्वी सराव करतांना स्वर वरवर म्हटले जाऊन त्यांतील चैतन्य अनुभवता न येणे आणि आता ‘स्वर आतून येऊन त्यांना एक प्रकारची आभा आली आहे’, असे वाटणे : पूर्वी एखाद्या रागाचा सराव करतांना त्यातील स्वर माझ्याकडून वरवर म्हटले जायचे. त्यामुळे त्यांतील चैतन्य मला अनुभवता येत नव्हते. आता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने गातांना ‘स्वर आतून येतात’, असे वाटते. त्या वेळी ‘स्वरांना एक प्रकारची आभा (तेज) आली आहे’, असे मला जाणवते.

३ ई. आध्यात्मिक त्रास होऊनही सरावाचा सकारात्मक परिणाम अनुभवता येऊ लागणे : मला त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तीला शास्त्रीय संगीताचा त्रास होत असल्याने पूर्वी गायनाचा सराव करतांना मला अल्प प्रमाणात भावस्थिती अनुभवता यायची. आता सराव करतांना आध्यात्मिक त्रास होऊनही त्यावर मात करून सरावाचा सकारात्मक परिणाम अनुभवता येण्याचे प्रमाण वाढले आहे.

३ उ. पूर्वी केवळ आवड म्हणून गायन शिकण्याची इच्छा असणे आणि आता ‘गायनातून देवाला अनुभवावे’, असे वाटणे : पूर्वी मला केवळ आवड म्हणून गायन शिकण्याची इच्छा होती. तेव्हा ‘संगीत शिकणे आणि त्यामागील शास्त्र जाणून घेणे’, हे विचार अधिक असायचे. आता ‘मला देवावर प्रेम करायचे आहे, त्याच्याशी एकरूप व्हायचे आहे’, हे विचार प्रबळ असतात. त्यामुळे आता संगीताकडे केवळ माध्यम म्हणून पाहिले जाते. ‘खरा आनंद ईश्वराच्या स्मरणाने मिळतो’, हे माझ्या लक्षात आले.

४. सरावाच्या वेळी आलेल्या अनुभूती

४ अ. पहाटे खालच्या पट्टीतील स्वरांचा (खर्जाचा) सराव करतांना शांत वाटून मन पुष्कळ एकाग्र होणे : मी एकदा पहाटे ५.३० वाजता खालच्या पट्टीतील स्वरांचा (खर्जाचा) सराव केला. तेव्हा माझे मन शांत होऊन पुष्कळ एकाग्र झाले होते. त्या वेळी मी काही वेळ ध्यानावस्था अनुभवली. मला त्या स्थितीतून बाहेर येऊन वरच्या पट्टीतील स्वरांचा सराव करण्याची इच्छाच होत नव्हती. या प्रसंगातू ‘पहाटेच्या वेळी खालचे स्वर अधिक चांगले लागतात’, हे माझ्या लक्षात आले.

४ आ. ‘गायनाचा सराव करतांना माझ्यावर नामजपादी उपाय होतात’, असे मला जाणवते.

४ इ. सरावामुळे आध्यात्मिक त्रास उणावून विशुद्धचक्राच्या ठिकाणी असलेल्या त्रासदायक शक्तीच्या आवरणाची जाणीव होणे आणि सरावाच्या वेळी ढेकरा अन् जांभई येऊन त्या चक्राचीही शुद्धी होणे : ‘प्राणशक्तीवहन’ संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवर करायचे उपाय’ या ग्रंथात दिलेल्या पद्धतीप्रमाणे नामजपादी उपाय शोधतांना आणि अन्य वेळीही ‘माझ्या केवळ अनाहत अन् आज्ञा या चक्रांच्या ठिकाणी त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, असे मला जाणवायचे. गायनाचा सराव चालू केल्यानंतर माझा आध्यात्मिक त्रास उणावल्याने नामजपादी उपाय शोधतांना ‘माझ्या विशुद्धचक्राच्या ठिकाणीही त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, असे माझ्या लक्षात आले. सराव करायला आरंभ केल्यापासून ढेकरा आणि जांभई यांच्या माध्यमातून माझ्या विशुद्ध चक्राचीही शुद्धी होऊन तेथील त्रासदायक शक्तीचे आवरण घटले आहे.’

– कु. रेणुका कुलकर्णी, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२४.८.२०२१)

टीप : अलंकार (पलटा) : विशिष्ट क्रमाने केलेल्या स्वर रचनेस ‘अलंकार’ किंवा ‘पलटा’ असे म्हणतात.

तान : दृत (जलद) गतीत केलेला स्वरविस्तार

आलाप : संथ गतीने केलेला स्वरविस्तार

राग : ज्या नियमबद्ध स्वर समुहामुळे सर्वांचे मनोरंजन होते आणि रसनिर्मिती होते, त्या स्वरसमूहास ‘राग’ असे म्हणतात, उदा. राग भैरव, भैरवी, देस, भूप, मालकंस इत्यादी

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक