सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सांगितलेल्या नामजपानुसार साधिकेच्या रुग्ण-नातेवाइकाने एक मास नामजप केल्यावर झालेले आश्चर्यकारक लाभ !

‘माझ्या एका जवळच्या नातेवाईकाला मागील ३० वर्षांपासून मधुमेहाचा आजार आहे. त्याला प्रतिदिन ‘इन्सुलीन’चे इंजेक्शन घ्यावे लागते. त्यातच त्याचा रक्तदाबही वाढलेला असतो. या दोन्ही दीर्घकालीन आजारांमुळे ‘त्याच्या मूत्रवहन संस्थेवर पुष्कळ दुष्परिणाम झाला आहे’, असे जून २०२१ मध्ये रक्त तपासणी केल्यावर त्याच्यावर औषधोपचार करणार्‍या तज्ञ आधुनिक वैद्यांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाईकाला तुमच्यावर ‘डायलिसिस’ (मूत्रपिंडांचे कार्य योग्य प्रकारे होत नसतांना यंत्राच्या साहाय्याने केलेली रक्तशुद्धीकरण प्रक्रिया) चालू करण्याची वेळ येऊ शकते’, असे सांगितले. ते ऐकून ‘नातेवाईकावर ‘डायलिसिस’ चालू करण्याची वेळ येऊ नये’, असे मला वाटले.

त्या वेळी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला सुचले की, त्याला ‘सनातनचे उपायगुरु’ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी विकारांसाठी शोधलेला नामजप करण्यास सांगावे. त्याप्रमाणे मी त्याला नामजप सांगितला आणि आश्चर्य म्हणजे त्याने तो नामजप केल्यावर एका मासातच त्याच्या प्रकृतीत थोडी सुधारणा होऊन त्याच्या रक्तातील ‘क्रिएटिनीन’चे प्रमाण उणावले.

रुग्ण-नातेवाईकाच्या रक्ताचा जून २०२१ मधील, तसेच नामजप चालू केल्यावर १ मासाने केलेला जुलै २०२१ मधील रक्ताचा अहवाल पुढे दिला आहे. यातून विविध व्याधींसाठी औषधोपचारांच्या जोडीला ‘योग्य नामस्मरण केल्याने किती लाभ होतो ?’, हे लक्षात येते.

sadguru_mukul_gadgil_
सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ

१. रुग्ण-नातेवाइकाच्या रक्ताचा जून २०२१ मधील अहवाल

अ. रक्तातील ‘क्रिएटिनीन’चे प्रमाण २.४ mg \ dl (मिलीग्रॅम \ डेसीलिटर) होते. (‘क्रिएटिनीन’चे सर्वसाधारण प्रमाण ०.५ – ०.८ mg \ dl एवढे असते.)

आ. ‘GFR’ (Glomerular Filtration Rate, मूत्रपिंडांची कार्यक्षमता तपासण्यासाठी केली जाणारी चाचणी) २५ mL / min / 1.73 m2 (१५ – २९ mL / min / 1.73 m2 हे प्रमाण मूत्रपिंडांची क्षमता गंभीररित्या न्यून झाल्याचे दाखवते.)

हे दोन्ही अहवाल पाहिल्यावर ‘त्या नातेवाईकाला आता लवकरच ‘डायलिसिस’ (मूत्रपिंडांचे कार्य योग्य प्रकारे होत नसतांना यंत्राच्या साहाय्याने केलेली रक्तशुद्धीकरण प्रक्रिया) चालू करावे लागेल’, असे आम्हा आधुनिक वैद्यांना वाटले.

आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले

२. अहवाल पाहिल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये विकार दूर होण्यासाठी दिलेल्या नामजपाचे स्मरण होऊन नातेवाईकाला तो करायला सांगणे

वरील अहवाल पाहिल्यावर मला सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी विकार दूर होण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दिलेल्या नामजपाचे स्मरण झाले. मी नातेवाईकाला सद्गुरु काकांनी ‘क्रिएटिनीन’ न्यून करण्यासाठी शोधलेला आणि ‘दैनिक सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेला ‘श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री दुर्गादेव्यै नमः – श्री गुरुदेव दत्त – श्री हनुमते नमः ।’ हा नामजप व्हॉट्सॲपवरून पाठवला आणि त्याला तो प्रतिदिन १ घंटा करण्यास सांगितला.

३. औषधोपचारासह नामजप केल्यावर रुग्ण-नातेवाईकाचा जुलै २०२१ मध्ये आलेला अहवाल

नातेवाईकाने नामजप औषधोपचारांसह एक मास केल्यावर जुलै २०२१ मध्ये त्याच्या रक्ताचा अहवाल पुढीलप्रमाणे आला.

अ. रक्तातील ‘क्रिएटिनीन’चे प्रमाण १.७ mg \ dl होते, म्हणजे ते ०.७ ने उणावले होते.

आ. ‘GFR’ ३६ mL / min /1.73 m2 असा होता, म्हणजे हे प्रमाण ११ ने वाढले होते. (३० – ४४ mL / min /1.73 m2 हे प्रमाण ‘रेट’ मध्यम झाल्याचे दाखवते.)

विश्लेषण : ‘GFR’ वाढणे’, हे मूत्रपिंडांची क्षमता वाढल्याचे निर्देशक आहे. मूत्रपिंडांची क्षमता वाढल्यामुळे ‘क्रिएटिनीन’ हा टाकाऊ घटक शरिराबाहेर टाकला जातो. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण उणावते. त्यामुळे व्यक्तीला ‘डायलिसिस’ करण्याची आवश्यकता भासत नाही.

४. नातेवाईकाचे जून आणि जुलै मासांतील अहवाल

अशा प्रकारे नातेवाईकाला योग्य नामजप मिळून त्याने तो केल्याने ‘डायलिसिस’ करावे लागण्याची शक्यता न्यून झाली.

५. कृतज्ञता आणि प्रार्थना

‘सनातनचे उपायगुरु’ सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी अन् माझे नातेवाईक कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो. ‘आपली कृपादृष्टी अशीच आमच्यावर रहावी’, हीच कळकळीची प्रार्थना करते.’

– आधुनिक वैद्या (डॉ.) सौ. कस्तुरी भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक