मोठे विक्रेते स्वतःजवळ अमली पदार्थ बाळगत नसले, तरी त्यांच्यावर होणारी कारवाई योग्यच ! – पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय

अमली पदार्थ विक्रेत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

चंडीगड – पोलीस नेहमीच अमली पदार्थांची किरकोळ विक्री करणार्‍यांना अटक करतात. अमली पदार्थांच्या व्यापारामागे अनेक जण असतात. काही प्रकरणात अमली पदार्थांची विक्री आणि तस्करी करणार्‍यांना राजकीय संरक्षण मिळते. त्यामुळे पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा कधी हे तस्कर किंवा मोठे विक्रेते पकडले जातात, तेव्हा कायद्यातील पळवाटा आणि दबाव यांद्वारे शिक्षेपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. बर्‍याच वेळेला हे मोठे विक्रेते गरीब लोकांकडून किरकोळ स्वरूपात अमली पदार्थांची विक्री करवून घेत असल्याने पोलीस त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे ‘एखाद्याकडे अमली पदार्थ सापडले नाही म्हणजे त्याच्यावर कारवाई करू नये’, असे म्हणता येणार नाही, असे सांगत पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने एका मोठ्या अमली पदार्थ विक्रेत्याला अटकपूर्व जामीन देण्याचे या वेळी नाकारले. ‘अमली पदार्थ स्वतःजवळ न बाळण्याचाच प्रयत्न मोठे विक्रेते करतात आणि कारवाईपासून स्वतःचे रक्षण करतात’, असेही न्यायालयाने या वेळी सांगितले.