गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याच्या उच्च न्यायालयाच्या मताचे स्वागत ! – मौलाना खालिद रशीद फिरंगी महली, सदस्य, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

केवळ असे स्वागत करणे अपेक्षित नाही, तर प्रत्यक्षात गोहत्या होऊ नये, यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने प्रयत्न केले पाहिजेत !  – संपादक

मौलाना खालिद रशीद फिरंगी महली

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अलाहाबाद उच्च न्यायालयाने गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्याविषयी व्यक्त केलेल्या मताचे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे सदस्य मौलाना (इस्लामी अभ्यासक) खालिद रशीद फिरंगी महली यांनी स्वागत केले आहे.

मौलाना महली म्हणाले की, हिंदु बांधवांच्या भावनांचा सन्मान केला पाहिजे. यामुळे देशात एकता आणि शांतता कायम राहील. न्यायालयाने निकाल देतांना म्हटले, ‘मोगलांच्या काळातही गोहत्येवर बंदी होती.’ बाबरने त्याचा पुत्र हुमायू याला सल्ला दिला होता की, हिंदूंच्या भावनांचा सन्मान कर आणि गोहत्येला कधीही अनुमती देऊ नको. हुमायूनंतर प्रत्येक मोगल शासकाने याचे पालन केले. मोगलांनी सर्व धर्म आणि त्यांचे विधी यांचा सन्मान केला होता. यामुळेच त्या वेळी धार्मिक लढाई झाली नाही.’ ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यसंग्रमाच्या वेळी लक्ष्मणपुरी येथील मौलाना बारी यांनी बकरी ईदच्या वेळी गोहत्येवर बंदी घालण्याचा फतवा काढला होता. आताही देशातील कोणताही मौलवी गोहत्येची बाजू घेत नाही. (असे आहे, तर देशात गोहत्या का केली जाते ? ती कायमस्वरूपी रोखण्यासाठी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड प्रयत्न का करत नाही किंवा मौलाना प्रयत्न का करत नाहीत ? यासाठी संपूर्ण देशात कायदा होण्यासाठी मागणी का करत नाहीत ? मुसलमानांना अनेक राज्यांत असलेल्या गोहत्या बंदी कायद्याचे पालन करण्याचे आवाहन ते का करत नाहीत ? – संपादक)