‘काही साधकांच्या मनात ‘अमुक साधकाची आध्यात्मिक उन्नती झाली. त्याच्यापेक्षा मी अधिक सेवा करतो; पण माझी आध्यात्मिक प्रगती अजून झाली नाही’, असा विचार असतो. त्यामुळे त्यांना निराशा येते.
१. आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी समष्टी सेवेसह अन्य घटकही कारणीभूत असणे
आध्यात्मिक प्रगती होण्यामध्ये ‘सेवाभाव’ हा एक घटक असला, तरी त्या साधकाची पूर्वजन्मीची साधना, संचित, प्रारब्ध, भाव, तळमळ, वाईट शक्तींचा त्रास, स्वभावदोष, अहं, वर्षभरातील साधनेचे प्रयत्न आदी घटकही कारणीभूत असतात. एखादा साधक मुळातच सात्त्विक असतो, तसेच त्याच्या प्रारब्धाची तीव्रताही अल्प असते. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती जलद गतीने होते.
बर्याच साधकांना तीव्र स्वरूपाचे शारीरिक आणि आध्यात्मिक त्रास असल्यास ते सेवा करू शकत नाहीत; पण त्यांची अंतर्मनातून चांगली साधना चालू असल्यास ती श्री गुरूंपर्यंत पोचते अन् त्यांची आध्यात्मिक प्रगती होते. वयापरत्वे समष्टी सेवा करू न शकणारे; पण भगवंताप्रतीच्या आंतरिक भावामुळे ६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठलेले, तसेच संतपद प्राप्त केलेले अनेक साधक सनातन संस्थेमध्ये आहेत.
२. साधकांनो, आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांकडून शिका !
‘कार्य नव्हे, तर साधकांनी केलेले साधनेचे प्रयत्न त्यांच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतात’, असे परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितले आहे. स्वतःची तुलना इतरांशी करून दुःखी होण्याऐवजी ‘आध्यात्मिक प्रगती झालेल्या साधकांमध्ये कोणते गुण आहेत ? ते साधनेसाठी कसे प्रयत्न करतात ?’, हे समजून घेऊन त्या दृष्टीने मनापासून प्रयत्न करावेत.’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)