बेळगाव येथील पुष्पांजली पाटणकर (वय ७२ वर्षे) यांनी ६१ टक्के, तर सौ. पूजा परशुराम पाटील (वय ४८ वर्षे) यांनी गाठली ६२ टक्के आध्यात्मिक पातळी !

रक्षाबंधनाच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन विशेष सत्संगा’त परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिली आध्यात्मिक प्रगतीरूपी भावभेट !

बेळगाव – वय अधिक असूनही सतत गुरुचरणांचा ध्यास, गुरूंवरील श्रद्धा, भाव आणि साधकांवर निरपेक्ष प्रेम करणार्‍या पुष्पांजली पाटणकर (वय ७२ वर्षे) यांनी ६१ टक्के, तर सेवेप्रती भाव अन् तळमळ असणार्‍या, प्रत्येक सेवा मनापासून स्वीकारून कृती करणार्‍या, सतत कृतज्ञता भावात आणि शिकण्याच्या स्थितीत रहाणार्‍या सौ. पूजा परशुराम पाटील (वय ४८ वर्षे) यांनी ६२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली असून त्या जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाल्या आहेत, अशी आनंदवार्ता ६९ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. काशीनाथ प्रभु यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने २२.८.२०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन विशेष सत्संगा’त दिली. रक्षाबंधनाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून साधिकांना आध्यात्मिक प्रगतीरूपी अमूल्य भेट मिळाल्याने सर्वांचा आनंद द्विगुणित झाला.

पुष्पांजली पाटणकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सौ. शुभांगी कंग्राळकर

या वेळी सौ. पूजा परशुराम पाटील यांचा सत्कार खानापूर येथील सौ. तुळजा होनगेकर यांनी, तर पुष्पांजली पाटणकर यांचा सत्कार ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. शुभांगी कंग्राळकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन केला. सनातनच्या रामनाथी आश्रमात पूर्णवेळ सेवा करणारे आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सौ. पूजा पाटील यांचे पती श्री. परशुराम पाटील यांच्यासह या भावसोहळ्यामध्ये जिल्ह्यातील साधकही ऑनलाईन सहभागी झाले होते. या वेळी साधकांनी प्रगती झालेल्या साधिकांची गुणवैशिष्ट्ये सांगितली.

सौ. पूजा पाटील (डावीकडे) यांचा सत्कार करतांना सौ. तुळजा होनगेकर

सत्कार झालेल्या साधिकांचे मनोगत

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेनेच प्रगती झाली ! – पुष्पांजली पाटणकर

पुष्पांजली पाटणकर

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून प्रयत्न करवून घेतले. माझी प्रगती त्यांच्या कृपेमुळेच झाली आहे. त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञता !

प्रगतीचे ध्येय पूर्ण करण्याचे श्रेय परात्पर गुरुदेवांचे ! – सौ. पूजा पाटील

सौ. पूजा पाटील

गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले) प्रगती करवून घेतली, त्यासाठी त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. या प्रगतीचे ध्येय पूर्ण करण्याचे श्रेय गुरुदेवांचे आहे.

सौ. पूजा पाटील यांच्या नातेवाइकांचे मनोगत

१. श्री. परशुराम पाटील (सौ. पूजा पाटील यांचे पती) : माझ्या पत्नीने मला आश्रमात सेवेला जाण्यास अनुमती देऊन पुष्कळ मोठा त्याग केला आहे. ती माझ्या अनुपस्थितीत घरातील सर्व व्यवहार सांभाळते, तसेच तिने मुलांवर साधनेचे संस्कार केले. परात्पर गुरुदेवांची कृपा आणि तिची साधनेची तळमळ यांमुळेच तिने ६२ टक्के पातळी गाठली आहे.

२. श्री. ओम पाटील (सौ. पूजा पाटील यांचा मुलगा (वय २० वर्षे)) : आईने आम्हाला साधना आणि व्यवहार हे दोन्ही शिकवले. त्यासाठी तिचे कौतुक वाटते. (हे सांगतांना श्री. ओम याचा भाव जागृत झाला होता.)