ऑलिंपिक स्पर्धेत रौप्यपदक प्राप्त करणारे कुस्तीपटू रविकुमार दाहिया यांच्याकडून भगवान शिवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक !

भारतातील किती हिंदु खेळाडू ईश्‍वराची भक्ती करतात ? किंवा विजय मिळवल्यानंतर ईश्‍वराच्या चरणी लीन होतात ? – संपादक

कुस्तीपटू रविकुमार दाहिया

सोनिपत (हरियाणा) – टोकियो ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक प्राप्त केल्यानंतर कुस्तीपटू रविकुमार दहिया त्यांच्या गावी परतले आहेत. दाहिया यांची भगवान शिवावर नितांत श्रद्धा आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी टोकियोला जाण्यापूर्वी दाहिया यांनी ‘ऑलिंपिकमध्ये पदक मिळावे’ असे भगवान शिवाला साकडे घातले होते. त्याप्रमाणे त्यांना पदकाची प्राप्ती झाली. त्यानिमित्ताने त्यांनी हरिद्वार येथे कुटुंबियांसमवेत जाऊन गंगाजलाने महादेवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करून संकल्प पूर्णत्वास नेला.

रविकुमार दहिया यांच्या कुटुंबाची भगवान शिव आणि हनुमान यांच्यावर गाढ श्रद्धा आहे. दाहिया ऑलिंपिक स्पर्धेसाठी गेले असतांना कुटुंबियांनी त्यांच्या विजयासाठी संकल्प करून अखंड ज्योत प्रज्वलित केली होती. दहिया यांचे बंधू पंकज यांनी सांगितले की, रवि यांनी भगवान शिवाकडे ‘पुढील ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळावे’, असे साकडे घातले आहे. रविकुमार दाहिया भगवान शिवाचे दर्शन घेऊन त्याला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करत असल्याची छायाचित्रे सामाजिक माध्यमांत प्रसारित झाली आहेत.