(म्हणे) ‘ब्राह्मणेतरांच्या नियुक्त्या करतांना पूर्वीच्या पुजार्‍यांना काढणार नाही !’ – द्रमुक सरकार

तमिळनाडू सरकारकडून मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजार्‍यांच्या नियुक्तीचे प्रकरण

  • निवळ ब्राह्मणद्वेषापायी मंदिरांमध्ये अन्य जातींचे पुजारी नियुक्त करणारे द्रमुक सरकार ! द्रमुक पक्ष हा हिंदुद्वेषी आणि ब्राह्मणविरोधी असल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे राज्यातील मंदिरांमध्ये नियुक्त असलेल्या ब्राह्मण पुजार्‍यांना काढून टाकल्यास आश्‍चर्य वाटायला नको ! – संपादक
  • मंदिरांमध्ये कुणाची नियुक्ती करावी, याचा अधिकार हिंदु धर्माचा अभ्यास असणारे धर्माधिकारी आणि संत यांना आहे. त्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार द्रमुक सरकारला कुणी दिला ? चर्च आणि मशीद येथे सरकारने अशा प्रकारे नियुक्त्या केल्या असत्या का ? – संपादक
मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन

चेन्नई (तमिळनाडू) – द्रविड मुन्नेत्र कळघम् (द्रमुक) सरकारचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूमधील मंदिरांमध्ये ब्राह्मणेतर पुजार्‍यांची नियुक्त करण्याच्या घेतलेल्या निर्णायवरून वाद चालू आहे. याविषयी स्टॅलिन यांनी विधानसभेत म्हटले की, सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतला आहे. सर्व जातीच्या नव्या पुजार्‍यांच्या नियुक्तींच्या वेळी मंदिरात सध्या सेवारत असणार्‍या कोणत्याही पुजार्‍यांना काढण्यात येणार नाही आणि जर असे कुठे आढळून आले, तर संबंधितांवर कारवाई केली जाईल.

१. मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यापूर्वी राज्याचे धर्मादाय खात्याचे (हिंदु रिलीजिअस अ‍ॅण्ड चॅरीटेबल एन्डोव्हमेंट’चे) मंत्री पी.के. सेकर बाबू यांनी म्हटले होते की, ब्राह्मण पुजार्‍यांना लक्ष्य करण्यात आलेले नाही. माझ्या खात्याच्या अंतर्गत येणार्‍या सर्व मंदिरांमध्ये सर्व जातींच्या पुजार्‍यांची नियुक्ती करतांना कोणत्याही नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले नाही.

२. काही ब्राह्मण पुजार्‍यांनी आरोप केला आहे की, १६ ऑगस्ट या दिवशी आमची सेवा अचानक समाप्त करून आमच्या जागी अन्य पुजार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या आरोपावर पी.के. सेकर बाबू यांनी स्पष्टीकरण देतांना म्हटले की, काही हिंदुत्व शक्तींना अन्य लोकांना जीवनात पुढे जाऊ नये, असे वाटत आहे. ते अशा प्रकारची मोहीम राबवत आहेत.

३. मदुराई येथील मीनाक्षी अम्मन मंदिरांमध्ये पी. महाराजन् आणि एस्. अरुणकुमार या ब्राह्मणेतर पुजार्‍यांना नियुक्त करण्यात आली आहे. त्यांनी वर्ष २००७ मध्ये पुजारी बनवण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

४. तमिळनाडू सरकारने नियुक्त केलेल्या पुजार्‍यांपैकी २४ जणांनी राज्य सरकारने पुजारी बनण्यासाठी चालू केलेल्या केंद्रातून प्रशिक्षण घेतले आहे, तर इतर ३४ जणांनी इतर पाठशाळांमधून पुजारी बनण्याचे प्रशिक्षण घेतले आहे.

वर्ण हा जातीवर नसून गुणांवर आधारित ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

ज्याने ‘आगम शास्त्रा’चा अभ्यास केला आहे तो ‘ब्राह्मण’ ठरतो. वर्णाची संकल्पना जाणून घेण्यासाठी गीता वाचा. भगवान श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार वर्ण हा जातीवर नसून गुणांवर आधारित आहे, असे ट्वीट डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी या प्रकरणाविषयी केले आहे.