मुंबई – १६ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीच्या नियमांचे पालन करायला हवे. परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा दळणवळण बंदी लागू करावी लागू शकते, अशी चेतावणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. या वेळी भाषणात उद्धव ठाकरे यांनी वरील वक्तव्य केले.
या वेळी उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘मागील दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. कोरोनाचे संकट अद्यापही टळलेले नाही. काही देशांत ते पुन्हा उसळले आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. कोरोनाच्या काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत; परंतु ऑक्सिजनची कमतरता हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे राज्यातील ऑक्सिजनचा साठा लक्षात घेऊन नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्येही आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील; कारण ऑक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला दळणवळण बंदी पुन्हा लागू करावी लागेल.’’