मुलींना शाळेतच मिळावेत स्वरक्षणाचे धडे, सरकारला करणार शिफारस ! – विद्या गावडे, अध्यक्षा, राज्य महिला आयोग

स्वरक्षण प्रशिक्षण

पणजी, २ ऑगस्ट (वार्ता.) – मुलींना शाळेतच स्वरक्षणाचे धडे मिळावे, यासाठी सरकारला शिफारस करणार असल्याची माहिती ‘गोवा राज्य महिला आयोगा’च्या अध्यक्षा विद्या गावडे यांनी दिली आहे. ‘गोवा राज्य महिला आयोग’ महिलांवरील अत्याचार आणि इतर प्रकरणे हाताळत असते. (सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती गेल्या १८ वर्षांहून अधिक काळ स्वरक्षणाचे महत्त्व सांगत असून त्यांच्या वतीने स्वरक्षण प्रशिक्षण वर्गही आयोजित केले जातात. – संपादक)

सभेमध्ये सादर केलेली स्वरक्षण प्रात्यक्षिके

‘गोवा राज्य महिला आयोग’च्या अध्यक्षा विद्या गावडे पुढे म्हणाल्या, ‘‘शाळांतील मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण महिला आयोगाच्या वतीने देण्याचा विचार प्रथम पुढे आला होता; मात्र त्यानंतर कोरोना महामारीमुळे शाळा बंद झाल्याने हा विषय मागे पडला. मध्यंतरी इतर राज्यांतील महिला आयोगांच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण देण्याची सूचना मांडण्यात आली होती. मुलींना स्वरक्षण प्रशिक्षण महिला आयोगाच्या वतीने दिल्यास ते एक अतिरिक्त काम होईल. त्यापेक्षा शालेय अभ्यासक्रमांतर्गतच आणि शारीरिक शिक्षणाचा एक भाग म्हणून स्वरक्षण प्रशिक्षण देणे सोयीस्कर होईल. याअंतर्गत स्वरक्षणाचे ५ प्राथमिक प्रकार शिकवायचे. सक्तीचा विषय असल्याने आणि अभ्यासक्रमाचा एक भाग असल्यामुळे दहावीपर्यंत स्वरक्षणाचे ५ प्रकार मुली सहजपणे शिकू शकतील.’’