‘कृष्णभक्ती’ करण्यासाठी हरियाणातील IPS अधिकारी भारती अरोरा घेणार स्वेच्छा निवृत्ती !

पोलीस अधिकारी अरोरा यांच्याप्रमाणे अन्य पोलीस अधिकार्‍यांनीही कर्तव्य बजावत साधना केल्यास भारतात रामराज्य येण्यास साहाय्य होईल !

वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा

चंडीगड – संत मीराबाईंप्रमाणे कृष्णभक्तीमध्ये जीवन व्यतीत करण्यासाठी हरियाणाच्या वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी भारती अरोरा यांनी स्वेच्छा सेवानिवृत्तीसाठी आवेदन दिले आहे. अरोरा यांना त्यांचे उर्वरित आयुष्य धार्मिक कार्यात व्यतीत करायचे आहे. यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे. हरियाणा ‘कॅडर’च्या भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस्) अधिकारी अरोरा यांच्या आवेदनावर अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

१. हरियाणा रेल्वे पोलीसमध्ये पोलीस अधीक्षक असतांना त्यांनी समझौता बॉम्बस्फोट प्रकरणाच्या अन्वेेषणामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. नैसर्गिकपणे त्यांची निवृत्ती वर्ष २०३१ मध्ये झाली असती; परंतु त्यांनी १० वर्षे आधीच स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२. या संदर्भात त्यांनी २४ जुलै या दिवशी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. त्यांच्या मते पोलीस सेवा त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट राहिली आहे; परंतु त्यांना या पुढील जीवन धार्मिक पद्धतीने घालवायचे आहे. त्यांना चैतन्य महाप्रभु, संत कबीर आणि संत मीराबाई यांच्यासारखी भगवान श्रीकृष्णाची भक्ती करायची आहे. (पोलीसदलात असा अधिकारी किंवा कर्मचारी सापडणे, ही दुर्मिळातील दुर्मिळ गोष्टच म्हणावी लागेल ! – संपादक)

३. अरोरा यांचा विवाह हरियाणा कॅडरचे आयपीएस् विकास अरोरा यांच्याशी झाला आहे. ५० वर्षीय अरोरा या हरियाणाच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी आहेत, ज्यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी आवेदन केले आहे. सध्या वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. (हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने एखादी व्यक्ती धार्मिक कार्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेत असेल, तर त्याला समजावण्याचा प्रयत्न केला जातो, हे लक्षात घ्या ! याउलट जैन पंथामध्ये लहानपणीच मुले कोट्यवधी रुपयांच्या पालकांच्या संपत्तीचा त्याग करून संन्यासी होतात आणि त्यांची मिरवणूक काढली जाते; आनंदोत्सव साजरा केला जातो. – संपादक)