महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत झालेल्या ‘टास्क फोर्स’च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय !

राजेश टोपे, आरोग्यमंत्री

मुंबई – राज्यातील ज्या जिल्ह्यांत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, त्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी करण्यात येत होती. या पार्श्‍वभूमीवर राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत, तर ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसिद्धीमाध्यमांना दिली. २९ जुलै या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘टास्क फोर्स’ आणि आरोग्य विभाग यांच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. याविषयीचा अंतिम प्रस्ताव स्वाक्षरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

याविषयी अधिक माहिती देतांना राजेश टोपे म्हणाले, ‘‘मुंबईत कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना लोकल प्रवासाची अनुमती देण्यात यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे; मात्र या सगळ्याचे नियोजन करण्याचे दायित्व रेल्वे प्रशासनाकडे असेल. त्यामुळे याविषयी रेल्वे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील.’’

निर्बंध कायम असलेले ११ जिल्हे

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड आणि नगर या ११ जिल्ह्यांतील निर्बंध कायम रहाणार आहेत. या जिल्ह्यांतील रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध आणखी वाढण्यात येतील.

कोणते निर्बंध शिथिल होणार ?

निर्बंध शिथिल करण्यात येणार्‍या २५ जिल्ह्यांमध्ये शनिवारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्याऐवजी दुपारी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यात येतील आणि केवळ रविवारी दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. खासगी कार्यालयांतील सर्व कर्मचार्‍यांचे लसीकरण पूर्ण झाले असल्यास तेथे ५० टक्के कर्मचार्‍यांच्या क्षमतेने कार्यालये चालू ठेवण्यात येतील. ‘रेस्टॉरंट’ आणि चित्रपटगृहे अटी घालून चालू करण्यात येतील.