परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराच्या अन्वेषणासाठी पोलिसांकडून ७ सदस्यीय समिती स्थापन !

  • भ्रष्टाचाराने बरबटलेली पोलीस यंत्रणा !
  • भ्रष्टाचार करून खंडणी मागणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना सरकारने बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाकावे, असेच जनतेला वाटते !

मुंबई – येथील माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ६ जणांवरील भ्रष्टाचाराचे अन्वेषण करण्यासाठी पोलिसांनी २८ जुलै या दिवशी ७ सदस्यीय समितीची स्थापना केली आहे. त्याचे अध्यक्ष पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकारी असतील.

१. काही दिवसांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणी परमबीर सिंह यांच्यासह ८ पोलिसांवर ‘मरिन ड्राइव्ह’ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणात आमदार गीता जैन यांचा भाऊ संजय पुनामिया आणि सुनील जैन या दोघांना अटक करण्यात आली.

२. सिंह, पोलीस उपायुक्त पराग मणेरे आणि अन्य ५ पोलीस यांच्यावर ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात खंडणीचा आणखी एक गुन्हा नोंद झाला होता. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस निरीक्षक आशा कोरके, नंदकुमार गोपाळे, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे आणि संजय पाटील अशी गुन्हा नोंद झालेल्या पोलिसांची नावे आहेत. बांधकाम व्यावसायिक शाम सुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली होती.

३. सदर बांधकाम व्यावसायिकाने ‘माझ्या काकांवर ‘मकोका’ कायद्यांर्गत कारवाई करण्याची, तसेच माझ्या भावाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन एकूण ४ कोटी ६८ लाख रुपयांसह २ भूमी बळकावली’, असा आरोप पोलिसांवर केला. त्यानुसार पोलिसांवर कारवाई करण्यात आली.