निसर्गाचा प्रकोप !

गेले ४ दिवस महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांत काही ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा अपवाद वगळता अन्य जिल्ह्यांमध्ये भीषण, तर काही जिल्ह्यांमध्ये अतीभीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. अतीवृष्टीचे संकट वेगळे आणि त्यामुळे दरडी कोसळणे, भूस्खलन, महापूर यांच्यामुळे अनुभवण्यास आलेले निसर्गाचे रौद्ररूपी संकट हे आणखी वेगळे ! ४-५ दिवसांच्या या पावसामुळे लोकांची दैना उडाली आहे. सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सध्या पाणी शिरले आहे. चिपळूणमध्ये बाजारपेठ, शहरातील बराचसा भाग जलमय झाला आहे. लोकांची घरे पाण्याखाली गेली आहेत. रायगड येथील तळीये गावात दरड कोसळली, त्यामुळे ८० हून अधिक जण ढिगार्‍याखाली गाडले गेले. त्यांतील ४० हून अधिक जण मृत्यूमुखी पडले, तसेच अनेक जण अद्यापही ढिगार्‍याखालीच बेपत्ता आहेत. सातारा येथेही मिरगाव आणि आंबेघर येथे दरड कोसळल्यामुळे ११ जण मृत झाले आहेत, तर काहीजण अजूनही सापडलेले नाहीत. कोल्हापूर येथील पणदूर रस्ता भूकंप झाल्याप्रमाणे पूर्णपणे खचला आहे आणि तो पुन्हा दुरुस्त होण्यासाठी किती काळ लागेल सांगता येत नाही. अनेक ठिकाणचे रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी रेल्वे रुळ वाहून गेले आहेत.

महापूर

आतापर्यंत या नैसर्गिक आपत्तीत महाराष्ट्रात ११५ जणांचा मृत्यू झाला असून १०० हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. कोल्हापूर येथून कोकण, पश्चिम महाराष्ट्र येथे जाणारे सर्वच रस्ते पुराच्या पाण्यामुळे बंद करण्यात आले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या (एन्.डी.आर्.एफ्.) सैनिकांना रायगड आणि सातारा येथे पोचण्यास २ दिवस लागले. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीमुळे ना रस्त्यावरून जाता येईना, ना हवाई मार्गे अशी त्यांची परिस्थिती झाली. निसर्गाचा कोप शांत झाल्यानंतरच साहाय्य कार्य चालू करता आले. सांगली, कोल्हापूर येथील पूर परिस्थिती पाहून वर्ष २०१९ च्या भीषण पूर परिस्थितीची आठवण झाली. तेव्हाही लोकांना अक्षरश: बोटीत बसवून त्यांचे स्थलांतर करावे लागले होते. तेव्हा कोरोनाची भीती नव्हती. आता महापुराच्या जोडीला कोरोनाचे संकटही आहेच.

हवामान पालट !

चिपळूण आणि रायगड येथे दौरा करून आलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले, ‘हवामान पालटाविषयी आपण आतापर्यंत केवळ चर्चा करायचो; मात्र हा पालट प्रत्यक्ष दिसत आहे. कधीही कुठेतरी ढगफुटी होते, पूर येतो, दरडी कोसळतात. जे एवढ्या वर्षांत कधी अनुभवण्यास मिळाले नाही, ते घडते आहे.’ ‘सर्वकाही विपरीत घडते आहे’, असाच त्यांच्या बोलण्याचा सूर होता. प्रश्न असा आहे की, या नैसर्गिक आपत्तीला कोण उत्तरदायी आहे ?

चिपळूणमध्ये पूर ओसरल्यानंतर आता पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. २-३ दिवस दुकाने आणि घरे पाण्याखाली राहिल्यामुळे दुकानातील साहित्य आणि घरातील सामान यांची हानी झाली आहे. बाहेर पडायचे तर गाडीत पेट्रोल नाही आणि पेट्रालपंपात पाणी शिरल्यामुळे ते बंद. खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. मगरी आणि साप यांचा शहरी वस्तीत शिरकाव झाल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. ‘सरकार कुठल्या कुठल्या गोष्टीत साहाय्य करणार ?’ हा प्रश्नच आहे.

धर्माचरण करणे हिताचे

हिंदु धर्मात निसर्गाला, पंचमहाभूतांना देवतेची उपमा दिली आहे. हिंदु धर्मीय निसर्गाला देवता मानून त्याची मनोभावे पूजा-अर्चा करतात. कुठल्या ना कुठल्या सणाच्या वेळी सूर्य, वृक्ष, पर्वत इत्यादींची पूजा असतेच. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत निसर्गाला पूरक असेच हिंदूंचे विधी असतात. तीच हिंदु संस्कृती आणि सभ्यता आहे. जेथे धर्माचरण केले जाते, तेथे निसर्ग हा नेहमी मानवाला साथच देतो. नद्यांवर धरणे बांधून पाणी अडवणे, रसायनमिश्रीत पाणी थेट नदीपात्रात सोडणे, नदीमध्ये भराव घालून इमारती उभारणे, कचरा फेकणे, बेसुमार वृक्षतोड, सात्त्विकता वाढवण्याऐवजी रज-तम वाढवणार्‍या कृती करणे यांमुळे निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न होतो. निसर्ग एक ना एक दिवस याची परतफेड करतोच. तेव्हा सावरणेही कठीण होऊन बसते.

मुंबईच्या समुद्रात काही मुंबईकरांकडून कचरा फेकला जातो, चौपाट्यांवर गेलेले नागरिक केर समुद्रात टाकतात. २ वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात आलेल्या अतीप्रचंड लाटेने मुंबईकरांनी टाकलेला सर्वच्या सर्व कचरा मुंबईच्या किनार्‍यावर आणून टाकला. रस्त्यावर केराचे ढीगच्या ढीग जमा झाले होते. जे मानवाने पेरले, तेच उगवले असे म्हणावे लागेल.

भारतात सरकारी यंत्रणेच्या नावाने नेहेमी बोटे मोडली जातात. ‘सरकार काही करत नाही’, असे नागरिकांच्या तोंडी वाक्य असते. अशा प्रतिकूल परिस्थितीत सरकारी यंत्रणा तर फारच तोकडी पडते. सरकारी यंत्रणा साहाय्य करून करून किती करू शकणार ? साहाय्यासाठी हानीचे पंचनामे करून पीडितांपर्यंत साहाय्य पोचवण्यास पुष्कळ दिवस निघून जातात. आता साहाय्यासाठी हिंदूंच्या मठांनीच पुढाकार घेतला आहे. चित्रदुर्ग मठ आणि अन्य ठिकाणी लोकांच्या निवार्‍याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुढील काळ हा याहूनही प्रतिकूल असणार आहे. तेव्हा आपत्तींची मालिकाच चालू असणार आहे. तेव्हा ‘कुणी कुणाला कसे साहाय्य करू शकेल ?’ हा प्रश्नच आहे. सर्वत्र उडालेल्या भीषण परिस्थितीत किती पथके साहाय्यासाठी पोचू शकतील ? निसर्गावर जे आघात मानवाकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष झाले आहेत, त्याची परतफेड तो करणारच आहे. त्याला तोंड देण्यासाठी आता केवळ एकच मार्ग आहे, तो निसर्गाच्या निर्मात्याला म्हणजे भगवंताला शरण जाणे आणि पुढील आपत्तींना तोंड देण्यासाठी पूर्वसिद्धता करणे. याविषयी जागृती संत-महात्मे करीतच आहेत. आता आवश्यकता आहे त्यानुसार आचरण करण्याची !