आंबेघर (जिल्हा सातारा) येथे दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण दगावल्याची भीती !

स्थानिक ग्रामस्थ आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाने ११ जणांचे मृतदेह काढले बाहेर

आंबेघर दुर्घटना

सातारा – पाटण तालुक्यातील आंबेघर येथे २३ जुलैच्या मध्यरात्री २ वाजता दरड कोसळून ४ कुटुंबातील १४ जण ढिगार्‍याखाली दबले गेले. स्थानिकांनी साहाय्याची वाट न पहाता ढिगार्‍याखालून ६ मृतदेह बाहेर काढले. तोपर्यंत राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक घटनास्थळी पोचले. त्यांना ५ मृतदेह बाहेर काढता आले. मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

मोरणा गुरेघर धरणांतर्गत वसलेले आंबेघर हे छोटेसे गाव आहे. गावचा उंबरा केवळ १५ असून संपूर्ण गावावरच मध्यरात्री दरड कोसळली. मध्यरात्रीतच गावातील ६ कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले; मात्र मुसळधार पाऊस आणि तुटलेले रस्ते यांमुळे स्थलांतरीत कुटुंबेही पावसातच अडकून पडली होती. गावाकडे जाण्यासाठी असलेले रस्ते पूर्णत: नष्ट झाल्यामुळे साहाय्याला अडथळे येत होते. घटनास्थळी चिखल झाल्यामुळे कोणतीच यंत्रणा वेळेत पोचू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच समाजसेवी संस्था, ग्रामस्थ, कराड, पाटण, पुणे, सातारा येथील नागरीक साहाय्यासाठी धावून गेले. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह हे पहाणी करण्यासाठी घटनास्थळी पोचले होते.