NEET Retest Scam Busted : टेलिग्रामवर ‘नीट’ची बनावट प्रश्‍नपत्रिका विकणार्‍या १९ वर्षीय विद्यार्थ्याला अटक

काही विद्यार्थ्यांनी विकत घेतली प्रश्‍नपत्रिका

(‘नीट’ म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट – राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश परीक्षा)

भिलवाडा (राजस्थान) – येथे ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या ३ दिवस आधी पोलिसांनी बनावट प्रश्‍नपत्रिका विकणार्‍या आकाश चौधरी या तरुणाला अटक केली आहे. १९ वर्षीय आकाश टेलिग्राम चॅनलद्वारे उमेदवारांना प्रश्‍नपत्रिका देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळत होता.

१. आकाश याने टेलिग्रामवर ‘पेपर माफिया’ नावाचे चॅनल बनवले होते. ओळख आणि घडामोडींचा मागोवा घेणे कठीण व्हावे, यासाठी तो अमेरिका स्थित ‘व्ही.पी.एन्.’द्वारे (‘व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्क’द्वारे) आणि ‘प्रॉक्सी नेटवर्क’द्वारे चॅनल चालवत होता, असा पोलिसांचा दावा आहे.

२. आकाश प्रश्‍नपत्रिकेसाठी ४ सहस्र रुपये घेत होता. पैसे देण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘क्यू.आर्. कोड’ पाठवत असे आणि रक्कम थेट त्याच्या बँक खात्यात मागवत असे. तो नीटच्या सिद्धतेशी संबंधित पुस्तकांची पाने स्कॅन करून त्यातून बनावट प्रश्‍नपत्रिका बनवत असे आणि तीच खरी फुटलेली प्रश्‍नपत्रिका असल्याचे भासवून उमेदवारांपर्यंत पोचवत असे

संपादकीय भूमिका

एकीकडे सरकार आणि प्रशासन आकाशपाताळ एक करून नीट पुनर्परीक्षेचे नियोजन करत आहे. अशात जर विद्यार्थी अशा बनावट प्रश्‍नपत्रिका विकत घेणार असतील, तर त्यांच्यावरही योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे !