गैरसमज करून वातावरण न बिघडवण्याचे केले आवाहन

वेंगुर्ला – आजगावसह आजूबाजूच्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा खाण (मायनिंग) प्रकल्प होऊ देणार नाही. या ठिकाणी प्रदूषणकारी प्रकल्पांऐवजी योग केंद्र, पंचतारांकित हॉटेल, असे प्रकल्प आणण्याचा आमचा मानस आहे. आमदार दीपक केसरकर हेदेखील त्यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यावरणाला पोषक आणि पर्यटनाला चालना देणारे प्रकल्पच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील. त्यामुळे कुणीही गैरसमज निर्माण करून येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये. मी पालकमंत्री असतांना लोकांवर कुणालाही बळजोरी करू देणार नाही, असा विश्वासही पालकमंत्री नितेश राणे यांनी १९ जून या दिवशी आजगाव ग्रामस्थांना दिला.
आजगाव येथील श्री वेतोबा मंदिरात खाण प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री राणे आले होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, आरोग्य सभापती रितेश राऊळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब, पोलीस उपअधीक्षक नयोमी साटम, यांच्यासह अन्य मान्यवर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आजगाव येथे होऊ घातलेल्या खाण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणानंतर गावात वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर २३ जूनला या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी महामोर्चा काढण्याची चेतावणी ग्रामस्थांकडून देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी श्री देव वेतोबा मंदिरात ग्रामस्थांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी मंत्री राणे यांनी २३ जूनला करण्यात येणारे आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन केले.
आजगाव खाण प्रकल्पाच्या मागे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी गैरसमज नको, असे मंत्री राणे यांनी या वेळी स्पष्ट केले.
तालुक्यातील आजगावसह दशक्रोशीतील १८ गावांत होणार्या खनिज ड्रोन सर्वेक्षणाच्या विरोधात आजगाव येथील श्री वेतोबा मंदिरात १८ जून या दिवशी बैठक झाली. या बैठकीत २३ जून या दिवशी आजगाव येथील श्री वेतोबा मंदिरापासून आरवली येथील श्री वेतोबा मंदिरापर्यंत सर्वेक्षणाच्या विरोधात महामोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
स्थानिकांच्या संमतीविना कोणताही प्रकल्प नको ! – आमदार दीपक केसरकर
सावंतवाडी – आजगावमध्ये खाण प्रकल्पाच्या विरोधात चालू असलेला आक्रोश थांबला पाहिजे. लोकांच्या भावना लक्षात न घेता कोणतेही विनाशकारी प्रकल्प या भागात येऊ नयेत. आजगाव येथे खाण सर्वेक्षण विरोधी आंदोलनातील ग्रामस्थांवर नोंद झालेल्या गुन्ह्यांमुळे त्यांना भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी हे गुन्हे मागे घेण्याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. स्थानिक नागरिकांना जे प्रकल्प हवे असतील, तेच प्रकल्प या भागात आले पाहिजेत. लोकांच्या विरोधात जाऊन कोणताही प्रकल्प लादला जाऊ नये, अशा शब्दांत आमदार दीपक केसरकर यांनी आजगाववासियांच्या खाण प्रकल्पविरोधी भूमिकेला पाठिंबा असल्याचे १९ जून या दिवशी स्पष्ट केले.
‘नीट’ परीक्षेसाठी गोव्यात सर्व केंद्रांवर कडक सुरक्षाव्यवस्था
फोंडा येथील नगरपालिकेच्या भाजी बाजाराच्या प्रवेशद्वारावरील ‘चिकन शॉप’ला पालिकेचे टाळे
न्हैचिआड सड्यावर खाण प्रकल्पासाठी माती परीक्षणाचा डाव ग्रामस्थांनी रोखला
सांगली जिल्ह्यातील ६ वैद्यकीय अधिकार्यांवर प्रशासनाची कारवाई !
पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक वज्रलेपनाला ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चा तीव्र विरोध !