खराडीतील भोंदू राधामोहन मिश्रासह ८ जण कह्यात !

पुणे – स्वतः देव असल्याचे भासवून २५ वर्षांपासून एकाच कुटुंबातील महिलांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक आणि मानसिक फसवणूक करणारा, तसेच उच्चशिक्षित तरुणीचा छळ करून बलात्कार करणारा भोंदू राधामोहन मिश्रा (वय ५९ वर्षे) याच्यासह २ पुरुष आणि ६ महिला सहकारी यांना खराडी पोलिसांनी कह्यात घेतले. भारतीय न्याय संहितेसह ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक’ कायद्याच्या कलम ३, ४ आणि ५ अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरून ८ भ्रमणसंगणक, १९ ‘हार्ड डिस्क’ (संगणकीय माहिती संचयक), २० ‘कॅसेट्स’ (ध्वनीचित्रफिती), १० ‘डीव्हीडी’ (दृकश्राव्य चकती), २ ‘सीपीयू’, २३ ‘पेन ड्राईव्ह’, ६ लाख ६० सहस्र रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने, असे २५ लाख रुपयांचे साहित्य जप्त केले.

राधामोहन मिश्रा याने पीडित महिलेच्या कुटुंबावर प्रभाव टाकून त्यांचा विश्वास संपादन केला. अंधश्रद्धेद्वारे अपलाभ घेत कुटुंबाची आर्थिक आणि भावनिक हानी केली. तिला शिवीगाळ आणि मारहाण करून बळजोरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांसह अन्य प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खराडी पोलिसांच्या पथकाने उबाळेनगर येथील घटनास्थळावर धाड घालून आरोपींना कह्यात घेतले. या घटनेचे पुढील अन्वेषण वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण करत आहेत.

संपादकीय भूमिका

  • महिलांनी धर्मशिक्षण घेतल्यास त्या भोंदूबाबांच्या आहारी जाणार नाहीत !
  • अशा भोंदूबाबांमुळे हिंदु धर्मातील संतांची अपकीर्ती होते, हे लक्षात घेऊन अशांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !