Andhra Pradesh Gold : आंध्रप्रदेशात ५० टन सोन्याचा साठा सापडल्याचा दावा

नवी देहली – आंध्रप्रदेशाच्या कर्नूल जिल्ह्यातील जोनागिरी गावात प्रचंड मोठा सोन्याचा साठा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अधिकार्‍यांच्या मते या भागात तब्बल ५० टन सोने असण्याची शक्यता आहे. राज्यात सोन्याच्या उत्खननासाठी जोनागिरी, रामगिरी, जव्वकुला आणि चिगुरुकुंटा बिस्नातम या भागांचा समावेश करण्यात आला आहे. ‘या सर्व ठिकाणांपैकी जोनागिरी प्रकल्पाकडून सर्वाधिक अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत’, असे आंध्रप्रदेश सरकारच्या खाण विभागाचे प्रधान सचिव मुकेश कुमार मीणा यांनी सांगितले.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार १० वर्षांपूर्वी जोनागिरी येथे सोन्याच्या उत्खननासाठी १ सहस्र ५०० एकर भूमी संमत करण्यात आली होती. आतापर्यंत केवळ ५०० एकर क्षेत्रामध्येच शोधमोहीम पूर्ण करण्यात आली असून या भागातून सुमारे १३ टन सोने मिळण्याचा अंदाज आहे. अद्याप उर्वरित १ सहस्र एकर क्षेत्राचा पूर्ण अभ्यास आणि उत्खनन बाकी आहे. या संपूर्ण क्षेत्राचा शोध पूर्ण झाल्यानंतर केवळ जोनागिरी परिसरातूनच सुमारे ५० टन सोने मिळू शकते, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

खाण विभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले की, सोन्याचे उत्खनन हे अत्यंत खर्चिक आणि तांत्रिक कौशल्याची गरज असलेले काम आहे. त्यामुळे सरकारने निविदा प्रक्रिया राबवून हे काम खासगी कंपन्यांकडे सोपवले आहे.

१ टन खजिनावर प्रक्रिया केल्यावर मिळते केवळ १ ग्रॅम सोने !

पूर्वी एका टन माती किंवा खनिज पदार्थातून अनुमाने ३ ग्रॅम सोने मिळत असे; मात्र आता एक टन खनिज पदार्थाची प्रक्रिया केल्यानंतर केवळ १ ग्रॅम सोने मिळत आहे. तज्ञांच्या मते जर एका टन खनिज पदार्थातून ०.८ ग्रॅमपेक्षा अल्प सोने मिळाले, तर उत्खनन आणि प्रक्रिया यांवरील खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे सोन्याच्या खाणींचे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.