‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या कृपेने सनातन संस्थेच्या गुरुपरंपरेत आम्हा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले हे गुरु म्हणून आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी त्यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून लाभल्या आहेत. हे तीन गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ) बाहेरून वेगवेगळे दिसत असले, तरी गुरुतत्त्व एकच असल्याची अनुभूती आजपर्यंत सहस्रो साधकांनी घेतली आहे. सनातनचे तीन गुरु ईश्वरी प्रेरणेने मानवी देहात राहून कार्यरत आहेत. ते त्यांच्या स्थूल देहाने सेवा करत असतात; मात्र त्यांचे कार्य केवळ त्यांच्या स्थूल शरिरापुरते मर्यादित नाही. स्थूल शरिरापेक्षा कित्येक पटींनी त्यांचे कार्य सूक्ष्मातून चालू असते. त्यांचे सूक्ष्मातील कार्य अलौकिक, विश्वव्यापक आणि बुद्धीअगम्य आहे. ते जाणून घेणे आम्हाला शक्य नाही, तरी ‘सर्वत्रच्या साधकांना तीन गुरूंच्या सूक्ष्मातील अगाध कार्याची थोडी तरी कल्पना यावी’, यासाठी काही सूत्रे येथे मांडली आहेत. ही सूत्रे मला गुरुदेवांनीच सुचवली असल्याने ती त्यांच्याच चरणी अर्पण करतो.
१. सनातनच्या तीन गुरूंच्या अस्तित्वानेच सनातन संस्थेचे कार्य आणि साधकांची साधना चालू असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘गुरुकृपायोग’ या ग्रंथामध्ये ‘गुरु कसे कार्य करतात ? याविषयी सविस्तर वर्णन केले आहे. त्यामध्ये ‘परात्पर गुरु’ हे केवळ अस्तित्वाने कार्य करतात’, असे लिहिले आहे. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी परात्पर गुरु डॉक्टरांशी एकरूप झाल्या आहेत. त्यामुळे सनातनच्या तीन गुरूंच्या अस्तित्वानेच सनातन संस्थेचे कार्य आणि साधकांची साधना चालू आहे. ‘आजपर्यंत सनातनच्या तीन गुरूंना कधी न भेटलेले जिज्ञासू किंवा साधक यांचा केवळ त्यांचे छायाचित्र पाहून भाव जागृत होणे, अनोळखी व्यक्ती साधनेला लागणे, धर्मप्रेमी आणि हितचिंतक यांना सनातन संस्थेला साहाय्य करण्याची प्रेरणा होणे, विदेशातील लोकांना स्वप्नात किंवा विचारांच्या माध्यमातून प्रेरणा मिळून ते साधनेकडे वळणे, विश्वातील सहस्रो साधकांना एकाच वेळी दैवी कण दिसणे, अनेक साधक धर्म किंवा साधना यांविषयी अंतःप्रेरणेने लिखाण करू शकणे’, हे सर्व केवळ तीन गुरूंच्या अस्तित्वाने होत आहे. तीन गुरूंच्या अस्तित्वाने होणारे कार्य हे सूक्ष्मातीसूक्ष्म आहे. ‘हे कार्य त्यांच्या अस्तित्वाने घडते’, एवढेच आपण जाणू शकतो; मात्र ‘ते कसे घडते ?’, हे देवरहस्य आहे, म्हणजेच ती अवतारी लीला आहे !
२. तीन गुरु साधकांना साधनेसाठी पूरक वातावरण निर्माण करून देण्याचे कार्य करत असणे
सनातनचे तीन गुरु साधकांच्या प्रकृतीनुसार त्यांना साधनेचा मार्ग सांगतात. एवढेच नव्हे, तर ते साधकांना साधना करण्यासाठी स्थुलातून आणि सूक्ष्मातून पूरक वातावरणही निर्माण करून देतात.
२ अ. गुरु स्थुलातून करत असलेले कार्य : साधकांच्या साधनेसाठी पूरक वातावरण निर्माण करण्यासाठी विविध आश्रम निर्माण करून त्यांना सेवेची संधी उपलब्ध करून देणे, संसारात राहून साधना करण्यासाठी अध्यात्मप्रसाराची सेवा उपलब्ध करून देणे इत्यादी.
२ आ. गुरु सूक्ष्मातून करत असलेले कार्य : आश्रम आणि साधकांच्या वास्तू यांतील वाईट शक्तींचे त्रास दूर करण्यासाठी, तसेच हे त्रास एका टप्प्याच्या पुढे वाढू न देणे आणि ‘साधकांना पेलवेल’, एवढेच त्रास त्यांना भोगायला देणे इत्यादी.
३. सनातन हिंदु धर्माप्रमाणेच तीन गुरु तत्त्वरूपाने सूक्ष्म आणि व्यापक असणे
सनातन संस्थेच्या तीन गुरूंचे निजस्वरूप आणि ‘सनातन हिंदु धर्म’ यांमध्ये साधर्म्य आहे. खरेतर ‘सनातन हिंदु धर्म’ आणि तीन गुरु एकच आहेत. धर्म हा सूक्ष्म आहे आणि व्यापकही आहे. त्याचप्रमाणे सनातनचे तीन गुरु हेही तत्त्वरूपाने सूक्ष्म आणि व्यापक आहेत. पृथ्वी, मनुष्य इत्यादी सर्वकाही त्यांच्यात सामावलेले आहे.
४. तीन गुरूंनी साधकांना अनेक अडचणींतून बाहेर काढणे
आजपर्यंत साधकांच्या साधनेत अनेक अडचणी आल्या; मात्र तीन गुरूंना त्यांचा ताण कधीही आला नाही. उलट आतापर्यंतच्या सर्व अडचणींतून श्री गुरूंनी साधकांना बाहेर काढले आहे.
५. हिंदु राष्ट्र-स्थापनेचे विश्वव्यापक कार्य करणारे तीन गुरु !
जे विश्वव्यापक आहेत, तेच विश्वव्यापक कार्य करू शकतात. धर्म, राष्ट्र आणि मानवजातीचे हित यांसाठी ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापने’सारखा विश्वव्यापक संकल्प करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले अन् त्यांचे हे विश्वव्यापक कार्य पुढे चालवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणी आम्ही सर्व साधक नतमस्तक आहोत !
६. तीन गुरूंनी दैवी शक्तींना तुल्यबळ असलेल्या बलाढ्य वाईट शक्तींचा जोर न्यून करणे
६ अ. ब्रह्मांडातील दैवी शक्तींना तुल्यबळ अशा मोठ्या वाईट शक्तीही कार्यरत असणे : ब्रह्मांड चालवण्याचे कार्य ईश्वराने देवतांना दिले आहे. या दैवी शक्ती संपूर्ण ब्रह्मांड चालवत असतात. आपण ज्या पृथ्वीवर रहातो, ती पृथ्वीही खरेतर दैवी शक्तीच चालवत आहेत; मात्र मनुष्याला त्याच्या अहंकारामुळे हे लक्षात येत नाही. ज्याप्रमाणे ब्रह्मांडात दैवी शक्ती आहेत, त्याचप्रमाणे या दैवी शक्तींना तुल्यबळ अशा मोठ्या वाईट शक्तीही आहेत. ‘अतल, वितल, सुतल, तलातल, महातल, रसातल आणि पाताल’, अशी सप्त पाताळे आहेत. या सप्त पाताळांमध्ये वाईट शक्ती वास करतात.
६ आ. कलियुगात दैवी शक्तींपेक्षा वाईट शक्तींचे पारडे जड असल्याने ब्रह्मांडाचे संतुलन राखण्यासाठी ईश्वराने सनातनच्या तीन गुरूंच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेणे : ब्रह्मांडाच्या संचालनात आणि ईश्वराच्या लीलेमध्ये जसे देवतांना महत्त्व आहे, तसेच वाईट शक्तींनाही महत्त्व आहे. प्रकाशाचे महत्त्व अंधारामुळे लक्षात येते. तसे हे आहे. ब्रह्मांडात कधी दैवी शक्तींचे पारडे जड असते, तर कधी वाईट शक्तींचे पारडे जड असते. ब्रह्मांडाचे संचालन करणारा ईश्वर युगानुयुगे, अनेक कल्पे आणि अनेक मन्वंतरे ब्रह्मांडाचे संतुलन राखतो. प्रस्तुत कलियुगात वाईट शक्तींचे पारडे जड असल्याने ब्रह्मांडाचे संतुलन राखण्यासाठी ईश्वराने सनातनच्या तीन गुरूंच्या रूपात पृथ्वीवर अवतार धारण केला आहे.
६ इ. ‘वाईट शक्तींनी निर्माण केलेले सूक्ष्मातील रज-तमाचे प्रदूषण न्यून करणे आणि सत्त्वगुणप्रधान राज्य स्थापन करणे’, हे तीन गुरूंचे कार्य असणे : जेव्हा भगवंत पृथ्वीवर मानवी रूपात अवतार घेतो, तेव्हा युगानुयुगांपासून अस्तित्वात असलेल्या वाईट शक्तीही भगवंताला विरोध करण्यासाठी प्रकट होतात. सध्या समाजात जे वैचारिक प्रदूषण झाले आहे, त्याचे कारण वाईट शक्तीच आहेत. वाईट शक्तींनी मोठ्या प्रमाणात रज-तम वाढवले आहे. रज-तमाचे प्रदूषण अन्य कुठल्याही प्रदूषणापेक्षा अधिक हानीकारक असते. सनातनचे तीन गुरु त्यांच्या केवळ अस्तित्वानेच वाईट शक्तींशी लढत आहेत. हे सर्व सूक्ष्मातून घडत असल्याने सर्वसामान्य मनुष्याला त्याविषयी काही कळणे शक्य नाही. विश्वातील रज-तमाचे प्रदूषण न्यून करण्याची क्षमता सनातनच्या तीन गुरूंमध्ये आहे. ‘वाईट शक्तींनी निर्माण केलेले सूक्ष्मातील रज-तमाचे प्रदूषण न्यून करणे आणि सत्त्वगुणप्रधान राज्य स्थापन करणे’, हे तीन गुरूंचे कार्य आहे.
७. सत्त्वगुणी आचार-विचार असलेल्या साधकांची निर्मिती करण्यासाठी सूक्ष्मातून कार्यरत असलेले सनातनचे तीन गुरु !
धर्म हा आचार आणि विचार यांच्याशी संबंधित आहे. आचार-विचार जेवढे शुद्ध असतील, तेवढी सृष्टी आनंदी असेल. आज आचार आणि विचार दोन्ही भ्रष्ट झाले आहेत. सत्त्वगुणी आचार आणि विचार असलेल्या साधकांची निर्मिती करून समाजासमोर आदर्श ठेवण्यासाठी सनातनचे तीन गुरु सूक्ष्मातून सतत कार्यरत आहेत.
८. तीन गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे
सध्या घोर कलियुग आहे. त्यामुळे माया प्रबळ आहे. हे अहंकाराचे युग आहे. अशा स्थितीत ‘सामान्य साधकाने साधना करणे आणि त्याची आध्यात्मिक पातळी वर्षाला १ टक्का वाढणे’, हेही कठीण आहे. जेव्हा सनातनच्या एखाद्या साधकाची आध्यात्मिक पातळी वर्षाला १ टक्का वाढते, तेव्हा त्यातील अर्धा टक्का प्रगतीचे कारण, म्हणजे त्या साधकाचे प्रयत्न आणि उर्वरित अर्धा टक्का प्रगतीचे कारण, म्हणजे तीन गुरूंचे कृपाशीर्वाद होत. श्री गुरूंचे कृपाशीर्वाद प्राप्त झाल्याविना जीव जन्म-मृत्यूच्या चक्रातून बाहेर पडणार कसा ?
९. सर्वकाही करून नामानिराळे रहाणारे सनातनचे तीन गुरु !
आजपर्यंत गुरुदेवांनी साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीचे सर्व श्रेय साधकांनाच दिले आहे. आम्ही साधक श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना म्हणतो, ‘‘तुमच्यामुळे आमची प्रगती झाली.’’ तेव्हा त्याही गुरुदेवांप्रमाणे ‘तुमच्याच प्रयत्नांना ईश्वराने फळ दिले आहे’, असे म्हणतात. ‘सर्वकाही गुरूच करतात; मात्र ते नामानिराळे रहातात’, हे एक गोड सत्य आहे !
सनातनचे तीन गुरु म्हणजे सनातनच्या प्रत्येक साधकातील आध्यात्मिक ऊर्जा होय. सनातनचे तीन गुरु म्हणजे साधकाच्या आत सूक्ष्मातून वास करणारा चिरंतन असा ‘सत्-चित्-आनंद’ ! अशा ‘सत्-चित्-आनंद’स्वरूप सनातनच्या तीन गुरूंच्या चरणी आम्हा सर्व साधकांचे कोटी कोटी नमस्कार !
१०. प्रार्थना
‘गुरुदेवा, ‘हे सर्व लिहिण्याची माझी क्षमता नाही. या आधी ‘असे काही लिहूया’, असा विचारही माझ्या मनात आला नव्हता. आपण स्फूर्तीरूपाने दिलेले विचार शब्दरूपातून आपणच माझ्या माध्यमातून मांडले आहेत. या वेळी ‘मनाला जे जाणवत होते, ते शब्दांत मांडणे अशक्य आहे’, हेही मला शिकायला मिळाले.
सद्गुरुचरणार्पणमस्तु ।’
– श्री. विनायक शानभाग, देहली (१७.७.२०२१)
|