भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन केली मागणी !
मुंबई – भारताच्या विभाजनाची दुःखद आठवण करून देणारे जिन्ना हाऊस स्वातंत्र्यानंतर ओस पडून आहे. स्वातंत्र्यापूर्वी मोहम्मद अली जिन्ना यांनी १० वर्षे तेथेच राहून भारताचे ३ तुकड्यांमध्ये विभाजन करण्याचा कट रचला होता. भारताच्या विभाजनाच्या दु:खद आठवणींना उजाळा देणारे हे हाऊस कह्यात घेऊन तेथे प्रस्तावित असलेले दक्षिण आशिया कला आणि सांस्कृतिक केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया लवकर चालू करावी, अशी मागणी भाजपचे मुंबईचे शहराध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. २० जुलै या दिवशी नवी देहली येथे अमित शहा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार लोढा यांनी याविषयीचे निवदेन त्यांना दिले.
Mumbai BJP to Amit Shah: Convert Jinnah House into cultural centre https://t.co/P3xkeRlOFy
— TOI Mumbai (@TOIMumbai) July 21, 2021
भारत सरकारने वर्ष २०१७ मध्ये ४९ वर्षे जुन्या असलेल्या शत्रू मालमत्ता कायद्यात दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनुसार पाकिस्तानात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मालमत्तेवर आता त्यांचा वारस किंवा नातेवाईक यांचा अधिकार नसून केवळ भारत शासनाचा अधिकार असेल. देशातील अशा ९ सहस्र २८० मालमत्तांचा भारत शासन लिलाव करणार आहे. या मालमत्तांपैकी मुंबईत असलेले जिन्ना हाऊस हे दक्षिण आशिया कला आणि संस्कृती केंद्र उभारण्यासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. जिन्ना हाऊसच्या मुख्य दरवाजावर तसा फलकही लावण्यात आला आहे. ‘जिन्ना हाऊन लवकर संपादन करून या बांधकामाची प्रक्रियाही लवकरात लवकर चालू करावी’, अशी मागणी आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे.