संभाजीनगर, १५ जुलै (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र संस्कृत श्लोक आणि प्राकृत ओवी स्वरूपात (पारायण प्रत) राष्ट्रीय वारकरी परिषदेने संकलित केले आहे. हे कार्य महत्त्वाचे असून हिंदु समाजाला दिशा देणारे आणि भारतातील सर्व समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. या कार्यासाठी राष्ट्रीय वारकरी परिषदेवर पांडुरंगाची कृपा आहे. भगवंताच्या कृपेविना असे कार्य होत नाही. सध्या सर्वत्र हिंदु राष्ट्राची मागणी होत आहे, ते हिंदु राष्ट्र म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी चालवलेले हिंदवी स्वराज्य आहे. त्यामुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हा ग्रंथ उपयुक्त आहे, असे कौतुकोद़्गार हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य आणि मुंबई उच्च न्यायालयाचे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी काढले, तसेच त्यांनी पुढील कार्यास मन:पूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. अरुण महाराज पिंपळे यांनी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली, तसेच ‘शिवचरित्र’ पारायण प्रत भेट देऊन आशीर्वाद घेतले. या वेळी पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी म्हणाले की, जगाच्या नकाशावर छत्रपती शिवाजी महाराज यांची खरी ओळख समोर येणे आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये ‘शिवचरित्र’ या ग्रंथाचा अभ्यास करणे, पारायण करणे क्रमप्राप्त झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देव, संत, हिंदु धर्म, गोमाता यांचे रक्षण केले. त्या इतिहासाची जाणीव या ‘शिवचरित्रा’च्या माध्यमातून होईल.