‘मी आणि माझी आई गेल्या २० वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहोत. आम्ही अन्य पंथीय आहोत. ‘मनुष्यजन्म पुष्कळ अनमोल आहे आणि याच जन्मात आपण साधना करून ईश्वराप्राप्ती करू शकतो’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आम्हाला कळले. सतत साधनारत रहाण्यासाठी आम्हाला पदोपदी संत आणि सद्गुरु यांचे मार्गदर्शन मिळते. ‘वेगवेगळ्या प्रसंगांच्या माध्यमातून आमच्या समाजाकडून आम्ही करत असलेल्या साधनेला कसा विरोध झाला ? आणि अनेक संकटे येऊनही भगवंताने आम्हाला कसे सांभाळले ?’, यांविषयी माझ्या अल्प बुद्धीला जे लक्षात आले, ते मी येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
१. आई सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर तिने नामजप चालू करणे
माझी आई साधनेत आली, त्या वेळी आमची परिस्थिती पुष्कळ हलाखीची होती. वडिलांना दारूचे पुष्कळ व्यसन होते. त्यामुळे आईला इतर ठिकाणी घरकाम करावे लागत होते. आई ती कामे करून आम्हाला सांभाळत होती. आई ज्या बाईंकडे घरकामाला होती, त्यांनी आईला सनातनच्या वतीने घेण्यात येणार्या सत्संगाविषयी सांगितले. आई त्या सत्संगाला गेली. तेथे आईला नामजपाचे महत्त्व कळले. लगेचच तिने आमच्या पंथानुसार नामजप चालू केला.
२. आईने नामजप चालू केल्यावर आलेली अनुभूती – पूर्वी कामाला न जाणारे वडील आईने नामजप चालू केल्यावर दुसर्याच दिवशी कामाला जाऊ लागणे
त्या वेळी माझे बाबा ६ मास कामालाच जात नव्हते; पण आईने नामजप चालू केल्यावर दुसर्याच दिवशी बाबांना कामाला जाण्याची इच्छा झाली आणि ते नियमित कामाला जाऊ लागले. देवाने आम्हाला नामजपाची ही सर्वांत मोठी अनुभूती दिली. तेव्हापासून नामजपाचे महत्त्व आमच्या लक्षात आले.
३. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत असतांना साधिकेच्या समाजाकडून झालेला विरोध
३ अ. साधिका स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराला गेल्याचे कळल्यावर समाजातील लोकांनी तिच्या आईला ‘तुमच्या कुटुंबाला वाळीत टाकू’, अशी धमकी देणे : आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो, तेव्हा आम्हाला आमच्या समाजाकडून पुष्कळ विरोध झाला. एकदा मी एका स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराला गेले होते. हे समाजातील काही लोकांना कळले. तेव्हा त्यांनी घरी येऊन आईला ‘तुमची मुलगी कुठे आहे ?’, असे विचारले. आईने ‘ती प्रशिक्षण शिबिराला गेली आहे’, असे सांगितले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘तुम्ही ब्राह्मणांकडे जाता आणि आपला पंथ सोडून त्यांचा प्रचार करता. आम्ही तुमच्या कुटुंबाला वाळीत टाकू. तुमच्या कुठल्याच कार्यक्रमाला आपल्या समाजातील कुणीच उपस्थित रहाणार नाही.’’
३ आ. देवघरातील परात्पर गुरु गुरुदेवांचे छायाचित्र काढण्यास सांगून ते पुन्हा न लावण्यास सांगणे : त्यांनी आमच्या देवघरातील परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र काढायला सांगितले आणि ‘तुम्ही हे छायाचित्र पुन्हा लावले नाही ना ?’, हे पहायला आम्ही पुन्हा येणार आहोत’, असे बोलून ते निघून गेले. त्या वेळी आई पुष्कळ रडत होती. तिने परात्पर गुरुदेवांचे छायाचित्र देवघरातून काढले. त्या वेळी माझे वडील हयात होते. त्यांनी आईला धीर देऊन सांगितले, ‘‘तू ते छायाचित्र पुन्हा देवघरात लाव. बघू कोण काय करते ते ?’’ बाबांनी आईला ते छायाचित्र पुन्हा देवघरात लावायला सांगितले. समाजातील लोक अधूनमधून वरीलप्रमाणे बोलून आईला मानसिक त्रास देत होते.
३ इ. भावाचे लग्न ठरल्यावर समाजाच्या पंचायतीच्या लोकांनी ‘सनातनमध्ये जाणार नसाल, तरच लग्नासाठी सहकार्य करू’, असे सांगणे आणि पुष्कळ बोलून आई अन् भाऊ यांना रडवणे : माझ्या बाबांच्या निधनानंतर १ वर्षाने माझ्या मोठ्या भावाचे लग्न ठरले. ही गोष्ट आमच्या समाजाच्या पंचायतीला आधी सांगावी लागते, तरच पंचायत सहकार्य करते. त्यामुळे आई पंचायतीच्या लोकांना भेटायला गेली होती. तेव्हा त्यांनी आईला विचारले, ‘‘तुम्ही अजून सनातनमध्ये जाता का ? आता मुलाचे लग्न ठरले; म्हणून तुम्ही पंचायतीकडे आला आहात. तुम्ही जर सनातनमध्ये जाणार नसाल, तरच आम्ही तुमच्या मुलाच्या लग्नासाठी साहाय्य करू, नाहीतर आम्ही तुम्हाला काहीच साहाय्य करणार नाही.’’ असे पुष्कळ काही बोलून त्यांनी आईला रडवले. माझा भाऊही रडत होता; पण लोक कर्मठाप्रमाणे बोलत होते. आम्ही सनातनमध्ये आहोत; म्हणून आमच्या समाजातील लोक ‘कुटुंबियांना मानसिक त्रास होईल आणि मनाला लागेल’, असे बोलतात; पण देवाच्या कृपेने आता कुटुंबीय त्यांना योग्य उत्तरे देऊन गप्प बसवतात.
३ ई. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या आमच्या समाजातील दुसर्या एका कुटुंबालाही लोकांनी धमकावल्यामुळे त्या कुटुंबातील काही जण साधनेपासून दूर जाणे : आमच्या समाजातील आमच्यासारखेच अजून एक कुटुंब सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. त्यांच्या घरीही लग्न जमले होते. त्या वेळी त्यांनाही समाजाच्या पंचायतीने ‘सनातनमध्ये गेलात, तर आम्ही तुम्हाला काहीच साहाय्य करणार नाही. तुम्हाला समाजात घेणार नाही’, असे सांगून वाळीत टाकण्याची धमकी दिली होती. त्यामुळे त्या कुटुंबातील काही जण साधनेपासून दूर गेले.
४. पंथाची सद्यःस्थिती
४ अ. एका ज्येष्ठ समाजसेवकाने हा पंथ स्वीकारल्यामुळे हिंदु धर्मातील काही पोटजातींतील लोकांनीही तोच पंथ स्वीकारणे आणि हिंदू विभागले जाणे : आता या पंथातील लोक पूर्वी हिंदूच होते; पण एका ज्येष्ठ समाजसेवकाने हा पंथ स्वीकारल्यामुळे हिंदु धर्मातील काही पोटजातींतील लोकांनीही हा पंथ स्वीकारला.
४ आ. जे हिंदू या पंथामध्ये आले आहेत, त्यांना ‘त्या समाजसेवकाचे लोक’ असे संबोधले जात असल्यामुळे त्यांना त्या लोकांनाही ‘आपण पूर्णपणे त्या पंथाचे नाही आणि पूर्णपणे हिंदूही नाही’, असे वाटते.
४ इ. या पंथातील काही लोक लपूनछपून हिंदु धर्मानुसार कुलधर्म-कुलाचार पाळत असणे आणि हिंदु देवतांची उपासना करत असणे : ज्या हिंदूंनी आज हा पंथ स्वीकारला आहे, ते हिंदूंच्या देवतांना आजही मानतात; पण त्यांनी हा पंथ स्वीकारला असल्यामुळे ते उघडपणे हिंदु देवतांची उपासना करू शकत नाहीत. त्यामुळे ते लपूनछपून हिंदु देवतांची उपासना करतात. काहींनी हा पंथ स्वीकारला असूनही ते पूर्वापार चालत आलेल्या रुढीपरंपरा जपतात, उदा. घरी गणपति बसवणे, गावी मुख्य घरी कुलाचार करणे किंवा काही घरगुती अडचणी उद्भवल्यास देवाला कौल लावणे, नवस करणे इत्यादी; पण ते या गोष्टी या पंथाच्या समाजाच्या नकळत करत असतात.
४ ई. ‘कुलाचार न पाळल्यास त्रास होतो’, अशी काही या पंथात गेलेल्या लोकांची श्रद्धा असणे, त्यासाठी ते हिंदु देवतांची उपासना करत असणे; मात्र या समाजातील काही जण हिंदुद्वेष करत असल्यामुळे त्यांनी हिंदु देवतांची उपासना करणार्यांना विरोध करणे : ‘जरी आपण या पंथाचे असलो, तरी ‘आपण आपला कुलाचार किंवा रुढी आणि परंपरा जपल्या नाहीत, तर त्याचा त्रास भोगावा लागतो’, अशी या पंथात गेलेल्या लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे बरेच जण हिंदु देवतांची उपासना करतांना आढळतात आणि ‘त्याचा त्यांना लाभही होत असतो’, असे त्यांच्या लक्षात येते; मात्र या समाजातील लोक हिंदु धर्माचा द्वेष करत असल्यामुळे त्यांतील काही जण हिंदु देवतांची उपासना करणार्यांना विरोध करतात. अशी अनेक उदाहरणे या पंथाच्या समाजामध्ये दिसून येतात.
४ उ. या पंथात लहानपणापासूनच ब्राह्मण आणि हिंदू यांच्या द्वेषाचेच संस्कार केले जात असणे अन् त्यांच्याकडून या पंथातील शिकवणीचेही पालन केले न जाणे : आम्ही लहान असतांना आम्हाला एका ज्येष्ठ समाजसेवक ‘ब्राह्मणांच्या विरोधात चळवळ कशी उभी केली ? ब्राह्मणांनी आपल्यावर कसे अत्याचार केले ? आपल्याला हा पंथ का स्वीकारावा लागला ?’, याविषयी सांगायचे. लहानपणापासूनच आमच्यावर ब्राह्मणद्वेषाचे संस्कार केले गेले आणि ‘आपल्या पंथाची शिकवण कशी श्रेष्ठ आहे ?’, हेच सांगितले गेले. मला जाणवले, ‘त्याग ही या पंथाची शिकवण आहे. या पंथात ‘मांसाहार करू नका’, असे सांगितले आहे, तरीही या पंथाचे लोक मांसाहार करतात. या पंथात अहिंसा, दया, क्षमा आणि शांती या गोष्टी शिकवल्या जातात; पण या समाजामध्ये त्यांचे आचरण होतांना कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा पंथ स्वीकारला, तरी त्याचे पूर्णपणे पालन केले जात नाही आणि हिंदु धर्माचेही पालन केले जात नाही. अशी सद्यःस्थिती आहे.’
५. हिंदु धर्माच्या विरोधात सांगितली जाणारी सूत्रे
‘आम्ही लहान असतांना माझ्या मामांची मुले आमची शिकवणी घ्यायचे. तेव्हा ते आम्हाला पुढीलप्रमाणे ब्राह्मणद्वेषही शिकवायचे.
अ. ब्राह्मणांनी आपल्याला करवंटीतून पाणी दिले.
आ. स्वतःची थुंकी स्वतः गिळायची, अन्य ठिकाणी थुंकायचे नाही, असे आपल्याला सांगितले जात होते.
इ. आपण शूद्र आहोत; म्हणून आपल्या कमरेला झाडू बांधलेला असायचा.
ई. आपली घरे गावच्या बाहेर असायची. त्यामुळे आपल्याला गावच्या बाहेर रहावे लागत असे.
उ. आपल्याला कोणत्याही मंदिरात प्रवेश नव्हता. त्यामुळे आपल्याला हा पंथ स्वीकारावा लागला.
ऊ. हा पंथ स्वीकारल्यामुळे आपण गुलामगिरीतून मुक्त झालो.
ए. आज आपण केवळ त्या थोर समाजसेवकामुळे पुष्कळ प्रगती केली आहे. त्यामुळे आपण त्यांचे अनुयायी आहोत.
ऐ. त्या थोर समाजसेवकाने या पंथाची दीक्षा घेतली. त्या वेळी ‘मी हिंदु म्हणून मरणार नाही. मी हिंदु देवतांना मानणार नाही. मी मंदिरात जाणार नाही. मी कर्मकांड करणार नाही. आपण हाच पंथ मानायचा’, ही त्यांनी घेतलेली शपथही आम्हाला सांगितली जाते. हे या पंथाचे तत्त्व सांगितले जाते. (प्रत्यक्षात त्या समाजातील लोकांची हिंदु देवतांवर श्रद्धा आहे; पण ‘देव नाही’, असा इतरांसमोर आव आणला जातो.)
ओ. ‘या पंथामध्ये हिंसा, कर्मकांड नाही, एकच देव आहे. त्यामुळे हा पंथ श्रेष्ठ आहे’, असे सांगितले जाते. हा पंथ स्थापणार्या विभूतीने स्वतःचे कुटुंब आणि सर्व सुख यांचा त्याग केला अन् इतरांना चांगली शिकवण दिली. त्यामुळे ‘आपण श्रेष्ठ आहोत’, असे पूर्वी सांगितले जात असे आणि आताही तसेच सांगितले जाते.
६. भीतीपोटी देवाला मानणे
६ अ. समाजामध्ये कुठल्याही घरी काही कार्यक्रम होणार असेल, तेव्हा मूळ घरी दिवा लावून पूजा अन् प्रार्थना केली जाणे : गावी आमचे मुख्य घर आहे. पूर्वी त्या ठिकाणी आता आम्ही रहातो, त्या वाडीतील ७ – ८ कुटुंबे रहायची. आता ते घर पडले आहे; पण त्या घरी मुख्य देव होते. आजही आमच्या कुणाच्या घरी काही कार्यक्रम असेल किंवा काही कार्यक्रम ठरला, तर त्या पूर्वी गावी असलेल्या त्या जागेवर दिवा लावून तेथे पूजा आणि प्रार्थना करूनच तो कार्यक्रम केला जातो. असे केले नाही, तर ‘कार्यक्रमामध्ये त्रास होतो’, असा समज लोकांमध्ये आहे.
६ आ. वास्तूशास्त्रानुसार वास्तू बांधणे : आमचे एक नातेवाईक आहेत. त्यांनी गावी घर बांधण्यापूर्वी देवाला कौल लावला. वास्तूशास्त्रानुसार वास्तूरचना समजून घेतली आणि वास्तूशास्त्राप्रमाणे गावी घर बांधले.
६ इ. घरी गणपति बसवणे : आमच्या समाजातील एक गृहस्थ आहेत. ते प्रतीवर्षी दीड दिवसाचा गणपति बसवतात. जर त्यांना कुणी विरोध केला, तर ते सरळ सांगतात, ‘माझ्याकडे ही फार पूर्वीपासूनची परंपरा आहे.’ ते ती परंपरा अजूनही पाळतात.
६ ई. हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवणे : हा पंथ स्थापन करणार्या विभूतीची जयंती साजरी करण्यात येते. तेव्हा महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला जातो. हळदीकुंकवाची प्रथा हिंदु धर्मात सांगितलेली आहे. मग या विभूतीच्या जयंतीच्या कार्यक्रमात हळदीकुंकवाचा कार्यक्रम कसा काय चालतो ? तेव्हा हा पंथ कुठे असतो ?
यावरून दिसून येते, ‘एकीकडे हिंदु धर्म मानायचा नाही आणि हिंदु धर्माला अन् देवतांना नावे ठेवायची अन् दुसरीकडे त्याच देवतांची पूजा करायची.’ ‘असे हे लोक दुतोंडीपणे कसे काय वागतात ? देव कधीतरी त्यांना यश देईल का ?’, असा मला प्रश्न पडतो. जर आपण हिंदु धर्म मानतच असू, तर तो पूर्णपणे मान्य करायला हवा, नाहीतर आपण मोठ्या पापाचे धनी होऊ.
७. समाजाची झालेली दिशाभूल आणि त्यांचे वाढलेले त्रास
या लोकांनी हा पंथ स्वीकारला असला, तरी सध्या ते दिशाहीन आहेत. त्यांच्या मुलांवर योग्य संस्कार न झाल्यामुळे मुले इतर पंथानुसार आचरण करतात. कुणी अन्य पंथाच्या प्रार्थनास्थळात जातात, तर कुणी मनाला वाटेल, तशी साधना करतात. देवावर श्रद्धा नसल्यामुळे त्यांच्यात नास्तिकता आहे. हा समाज अनेक प्रकारच्या अडचणींना तोंड देत आहे. अनेकांचे त्रासही वाढले आहेत. आध्यात्मिक त्रासही जाणवतात. ते कुणीही समजून घेण्याच्या स्थितीत नसतात आणि योग्य साधना करण्यासाठी मनाची सिद्धताही नसते. प्रत्येक कुटुंबामध्ये दारूचे व्यसन असणारी एकतरी व्यक्ती असतेच. त्यांना ‘कौटुंबिक कलह, मानसिक त्रास आणि पूर्वजांचे त्रास’ असे तीव्र त्रास होत आहेत. ते ‘योग्य साधना करणार्या किंवा धर्माचरण करणार्या व्यक्तीला विरोध करून ‘त्यांच्या साधनेत व्यत्यय आणणे आणि त्यांना साधनेपासून लांब ठेवण्यासाठी प्रयत्न करणे’, असे करतात.
८. पंथ स्थापन करणारी विभूती आणि तो पंथ स्वीकारणारे थोर समाजसेवक यांच्या जयंतीला समाजप्रबोधनासाठी काहीही न करता ‘ऑर्केस्ट्रा’ किंवा ‘कव्वाली’ असे करमणूकप्रधान कार्यक्रम आयोजित करणे
पंथ स्थापन करणारी विभूती आणि तो पंथ स्वीकारणारे थोर समाजसेवक यांची जयंती खरे तर त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून साजरी करायला पाहिजे; पण त्यांच्या जयंतीनिमित्त समाजातील लोकांमध्ये जणू एक प्रकारचा अहंकार निर्माण झालेला असतो. ‘आपण कुणीतरी मोठे आहोत’, असे प्रत्येकाचे वागणे असते. जयंतीच्या निमित्ताने समाजप्रबोधन होण्यासाठी कुठलाही प्रयत्न न करता अमाप पैशांचा व्यय करून ‘ऑर्केस्ट्रा’ आणि ‘कव्वाली’ असे करमणूकप्रधान कार्यक्रम आयोजित केले जातात. केवळ २ दिवसांच्या मनोरंजनासाठी लाखो रुपयांचा व्यय केला जातो. ‘या कार्यक्रमातून समाजाला खरोखर किती आणि कुठला लाभ होतो ?’, हा विचार करण्याची आवश्यकता आहे.
९. प्रार्थना आणि कृतज्ञता
अशा समाजामध्ये राहूनही गुरुदेवांच्या कृपेने आजवर आम्हाला साधना करण्यासाठी बळ आणि प्रेरणा मिळाली. त्यांच्या कृपेने आम्हाला अनेक संकटांमधून अलगद बाहेर पडता आले. ‘गुरुदेवांनी आम्हा सर्वांकडून अखंड साधना करवून घ्यावी’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !’
‘एका संतांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच हे मी लिहू शकले’, यासाठी त्यांच्या चरणी आणि परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– एक साधिका (१६.६.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |