पत्रकारांच्या हत्यांना वाचा फोडली जाते. आंदोलने करून देशात असहिष्णुता वाढल्याची आणि विचारस्वातंत्र्याचा गळा घोटला जाण्याची आवई उठवली जाते. पत्रकार असोत कि अन्य कुणीही, प्रत्येकाचा जगण्याचा सर्वांत मूलभूत अधिकार अबाधित राखणे अत्यावश्यक आहे. तो कुणी हिरावून घेत असेल, तर ते निषेधार्हच नव्हे, तर संतापजनकही आहेच ! देशातील अत्याचार आणि अन्याय यांच्या संदर्भात घडणार्या घटनांना वाचा फोडून शासन अन् समाज यांना जागृत करण्याचे कार्य पत्रकार समूहाकडून होणे अपेक्षित असते; परंतु प्रत्यक्षात आपल्या स्वार्थासाठी पत्रकारच एखाद्याच्या हत्येचा प्रयत्न करत असेल, तर ते मात्र अधिक चिंताजनक आहे. उत्तरप्रदेशच्या प्रयागराजमध्ये घडलेली या स्वरूपाची घटना हृदयाला हेलावून टाकणारी आहे. येथील एका व्यक्तीला घरमालकाने घर रिकामे करून जाण्यास सांगितले होते. त्या वेळी या व्यक्तीने ‘माझ्याकडे सध्या पैसे नाहीत’, असे सांगितले. तिच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेत सनसनाटी बातमी घडवून आणण्यासाठी येथील पत्रकार शमीम अहमद याने एक कथानक रचले. शमीमने या व्यक्तीला, ‘तू जर विधानभवनासमोर जाऊन स्वतःला पेटवून घेण्याचे नाटक केले, तर मी त्याचा व्हिडिओ बनवून दूरचित्रवाहिन्यांवरून प्रक्षेपित करीन. मग कुणीही तुला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार नाही’, असे आमीष दाखवले. त्यानुसार या व्यक्तीने विधानभवनासमोर कृती केली; मात्र यात ही व्यक्ती अधिक भाजल्याने तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी शमीमला अटक करण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ‘अशा प्रकारे वार्तांकन करण्याची अपेक्षा पत्रकाराकडून केली जाऊ शकत नाही’, असे सांगत या पत्रकाराला जामीन नाकारला. पत्रकारितेचा स्तर किती खालावला आहे, हे दाखवण्यासाठी ही घटना पुरेशी आहे.
अत्यल्प तारतम्य !
सनसनाटी बातमी करून त्यातून अधिकाधिक वाचकांना आपल्याकडे ओढायचे आणि त्या माध्यमातून वरिष्ठ पत्रकार, संपादक यांच्याकडून आपली वाहवा करवून घ्यायची ही मानसिकता पत्रकारिता क्षेत्राला कलंक आहे. वरील घटनाही त्याचाच परिपाक असून येनकेन प्रकारेण समाजाला वेठीस धरून अशा प्रकारे वार्तांकन केले जात आहे. संपादकीय विभागही अशा बातम्यांना प्राधान्याने प्रसृत करतो. या सर्वांमागे एकूण अर्थकारणाचा छुपा स्वार्थ आहे, हे उघड सत्य आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’, ‘सबसे आगे’, ‘एक्सक्ल्युझिव’, ‘सर्वांत पहिले आम्ही दाखवले’ आदी शब्दांचा भडीमार करत आजच्या बहुतांश प्रसारमाध्यमांत शिष्टाचार म्हणून कुठे कसे वागले पाहिजे, याचा ताळमेळ राहिलेला नाही. वर्ष १९९३ मधील एक घटना येथे आवर्जून सांगावीशी वाटते. आफ्रिकी देश सुदानमध्ये अन्नधान्याच्या टंचाईमुळे तेथील जनता मरायला टेकली होती. त्या वेळी तेथील सरकारी अन्नवाटप केंद्राकडे जात असलेली ३-४ वर्षांची एक मुलगी भुकेने व्याकूळ होऊन खाली कोसळली. ती मुलगी केव्हा मरते, या प्रतीक्षेमध्ये तेथे एक गिधाड बसले होते. या भयावह घटनेचे एका पत्रकाराने छायाचित्र काढले. हे छायाचित्र नंतर जगप्रसिद्ध झाले. कुणी एका संवेदनशील व्यक्तीने त्यावर मार्मिक टिपणी केली होती. ती अशी की, ‘त्या ठिकाणी एक सोडून दोन गिधाडे उपस्थित होती – एक तो पक्षी आणि दुसरा तो पत्रकार ज्याने त्या मुलीस मरण्यासाठी तसेच सोडून दिले होते.’ दु:खी आणि कष्टी जनतेला साहाय्य किंवा न्याय मिळावा, ही भावना अल्प होत चालली असून आपले ‘टीआर्पी’ कसे वाढेल, या विकृत भावनेचे हे उत्तम उदाहरण आहे. पुढे या पत्रकाराने आत्महत्या केली, हे एक वेगळे सूत्र; मात्र भारतातही अशी अनेक उदाहरणे पहायला मिळतील.
हिंदुद्वेषी पत्रकारिता !
पत्रकारितेच्या वृक्षाला लागलेले आणखी एक विखारी फळ म्हणजे ‘पेड न्यूज’ ! याचा अपलाभ अर्थातच आपल्याकडील अनेक राजकारणी आणि अन्य घटक घेतांना दिसतात. पत्रकारिता हे आपली विचारसरणी समाजात रूढ करण्याचे एक प्रभावी माध्यम म्हणूनही याकडे पाहिले जाते. ‘सबव्हर्जन’ला म्हणजे राष्ट्रीय धर्म, संस्कृती, आचार-विचार आदींना पालटण्यासाठी विविध स्तरांवर आखण्यात येणार्या कुटील षड्यंत्राला परिणामकारक खतपाणी घालण्यासाठीही पत्रकारितेस उत्कृष्ट हत्यार समजले जाते. ‘डिझाइनर पत्रकार’ नावाची संज्ञाही यातूनच जन्माला आली आहे. एखाद्या घटनेचे वार्तांकन आपल्या बोलवत्या धन्याचे मन राखण्यासाठी त्याप्रमाणे ‘डिझाइन’ करणे म्हणजेच रंगवणे नित्याचे झाले आहे. जिहादी आतंकवादी आक्रमणांनंतर ‘आतंकवादाला रंग नसतो’ असा गवगवा होणे अथवा हिंदूंना एखाद्या प्रकरणात गोवण्यात आल्यावर ‘भगव्या आतंकवादा’ची आरोळी ठोकण्याची प्रेरणाही यातूनच मिळत असते. पहलू खान, अकलाख यांच्या हत्यांना धार्मिक रंग दिला जातो, तर चंदन तिवारी, प्रशांत पुजारी हे वैयक्तिक वैमनस्याचे बळी म्हणून मान्यता पावतात. राजदीप सरदेसाई, अरफा खानुम, रविश कुमार, राणा आयुब आदी ‘एकसे बढकर एक’ उपटसुंभ असणार्यांचा भरणा आपल्याकडे आहेच. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ला ही देहलीमधून वृत्तांकनाचे कार्य बजावणारा पत्रकार हा भारतविरोधी विचारसरणी असलेला हवा असण्याचे बीजही ‘सबव्हर्जन’ला पुढे रेटण्यातच आहे.
पत्रकारितेसारख्या समाज‘हिता’च्या माध्यमाचे हात आपलाच समाज आणि राष्ट्र यांचे सर्वंकष ‘अहित’ होण्यासाठीच्या प्रयत्नांत बरबटले आहेत. समाजप्रबोधन आणि समाजपरिवर्तन या मार्गांन्वये राष्ट्राच्या सर्वांगीण उत्कर्षाचे ध्येय जनमानसापुढे आपल्या विचारांतून मांडण्याच्या अन् तो यशस्वी करण्याच्या सांघिक प्रयत्नांस ‘पत्रकारिता’ असे म्हणतात, अशी आमची पत्रकारितेची व्याख्या आहे. सध्याच्या या आत्मकेंद्रित पत्रकारी युगात ही व्याख्या दृग्गोचर होणे अशक्यप्राय आहे. वस्तूनिष्ठ, तसेच शुद्ध भावनेचा अभाव असलेल्या पत्रकारितेच्या या दुरवस्थेला सर्वंकष स्तरावर लोककल्याणाचे बीज असलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेशिवाय दुसरा पर्याय नाही, हे यामुळेच पुन्हा एकदा अधोरेखित होते.