देवद (पनवेल) येथील श्रीमती सुमन हनुमंत गडकरी (वय ८४ वर्षे) यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सुमन हनुमंत गडकरी (वय ८४ वर्षे) यांच्याविषयी साधिकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

श्रीमती सुमन गडकरी

१. उत्तम स्मरणशक्ती

‘गडकरीआजींचे सामान्य ज्ञान चांगले आहे. त्यांना अनेक विषयांची पुष्कळ माहिती आहे. त्यांनी बरेच ग्रंथ वाचले असून त्यातील माहिती आजींच्या अजूनही लक्षात आहे. त्यांनी आतापर्यंत चारधाम यात्रा आणि अनेक तीर्थयात्रा केल्या आहेत. त्यांनी अनेक मंदिरे पाहिली आहेत. ‘कुठल्या ठिकाणी काय वैशिष्ट्यपूर्ण आहे’, हे त्या बारकाव्यांसह सांगतात.’ – सौ. चंद्ररेखा जाखोटिया (सौ. चंद्ररेखा जाखोटिया यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले.- संकलक) आणि  सौ. सुषमा कुलकर्णी

२. सुगरण

‘आजी स्वयंपाकातही निपुण आहेत. सांगलीला काही वर्षांपूर्वी ‘तुळूनाड सांस्कृतिक भवन’मध्ये आजींकडे ५० मुलांचे दायित्व होते. त्या वेळी त्या अल्प वेळेत स्वयंपाक बनवायच्या. त्यांना मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ बनवायला पुष्कळ आवडायचे. ‘मुले एखादी भाजी खात नाहीत’, हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्या भाजीचे भरीत बनवायच्या आणि मुले ते भरीत आवडीने खात असत.’ – सौ. रेखा जाखोटिया

३. जवळीक साधणे

अ. ‘आजींचा स्वभाव बोलका आहे. त्या सर्वांशी मिळून मिसळून वागतात. एखाद्या साधकाची प्रकृती ठीक नसल्यास आजी त्या साधकांना औषध सांगतात आणि ‘औषध घेतले कि नाही’, हेही विचारतात.’ – सौ. रेखा जाखोटिया आणि सौ. सुषमा कुलकर्णी

आ. ‘आजी सर्वांशी प्रेमाने बोलतात. त्यांच्यातील प्रेमभावामुळे त्या सर्वांना आपलेसे करतात.’ – सौ. सुलोचना जाधव आणि कु. मनीषा पोशे

४. प्रांजळ

अ. ‘माळा करतांना आजींच्या हातून कधी मणी, सुई-दोरा पडतो. तेव्हा त्या प्रामाणिकपणे चूक सांगतात.’ – सौ. रेखा जाखोटिया, सौ. सुषमा कुलकर्णी आणि सौ. सुलोचना जाधव

आ. ‘आजींना चुका सांगितल्यास त्या लगेच चुका स्वीकारतात.’ – सौ. स्मिता नाणोसकर

५. मायेतून अलिप्त

अ. ‘त्या कधीही मायेतील किंवा भूतकाळातील विषयांवर चर्चा करत नाहीत.’ – सौ. स्मिता नाणोसकर

आ. ‘आजी मायेत अडकत नाहीत. आरंभी त्यांना घराची आठवण यायची; पण आता त्या घरी जाण्याविषयी काही बोलत नाहीत. ‘त्यांनी आश्रमजीवन पूर्णपणे स्वीकारले आहे’, असे वाटते. त्यांचे कुठल्याही गोष्टीविषयी गार्‍हाणे नसते.’ – सौ. रेखा जाखोटिया आणि सौ. सुषमा कुलकर्णी

६. सेवेची तळमळ

अ. ‘आजींना या वयातही सेवेची पुष्कळ तळमळ आहे’, हे त्यांच्या समवेत सेवा करतांना अनुभवता आले. त्या सेवा करतांना साधकांना सांभाळून घेतात.’ – श्रीमती अनुराधा माळगावकर

आ. ‘गडकरीआजी आणि मी एक वर्षापासून एकत्र सेवा करत आहोत. त्या सेवेसाठी वेळेत उपस्थित असतात.’ – सौ. सुलोचना जाधव

इ. ‘वयस्कर असूनही त्यांना सेवा करण्याची तळमळ आहे. त्या प्रेमाने, भावपूर्ण आणि अचूक सेवा करतात.’ – कु. मनीषा पोशे

ई. ‘त्या पुढाकार घेऊन सेवा करतात. एखाद्या दिवशी पहाटे उठून सेवा करायची असली, तरी त्यांची सिद्धता असते.’ – सौ. स्मिता नाणोसकर

७. ‘साधकांना सेवेत काही अडचण आल्यास आजी त्यांना तत्परतेने साहाय्य करतात.’- सौ. सुषमा कुलकर्णी (डिसेंबर २०१८)