शासनाने पर्यावरणाच्या दृष्टीने ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्तीवर बंदी आणली असल्याने यंदा मूर्तीकारांनी शाडूच्या मूर्ती सिद्ध केल्या आहेत. शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यात अधिक व्यय येत असल्याने मूर्तींच्या मूल्यामध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे भाविकांनी जर याकडे पाठ फिरवली, तर आर्थिक हानी होणार आहे, असे मत मूर्तीकारांनी व्यक्त केले आहे.
धर्मशास्त्रानुसार शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य आहे. आपण गणपतीला लाल फूल आणि दूर्वा वहातो. बेल किंवा तुळस वहात नाही. या कृतीमागे जसे शास्त्र आहे, तसेच शाडू मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यामागेही शास्त्र आहे. मूर्तीकार श्री. माधवराव गाडगीळ यांनी सनातननिर्मित सात्त्विक श्रीगणेशाच्या चित्रानुसार गणेशमूर्ती बनवतांना त्यांना ‘मूर्तीत हलकेपणा जाणवून त्यात देवत्व येत आहे’, असे जाणवले.’ यावरून धर्मशास्त्रानुसार मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याचे महत्त्व लक्षात येते. असे केल्यास श्रीगणेशाचा आशीर्वाद मिळून खर्या अर्थाने गणेशोत्सवाचा हेतू साध्य होईल. बर्याचदा लोकांकडून मूर्तीपेक्षा सजावट, खाद्यपदार्थ यांवर अधिक प्रमाणात व्यय केला जातो. बाजारातही वेगवेगळ्या प्रकारचे मोदक, मिठाई, वस्तू आदींची उपलब्धता वाढते. लोकांचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. अशा वेळी प्रतिष्ठा जपण्याच्या अहमहमिकेपोटी अनावश्यक व्यय केला जातो. प्रत्यक्षात याचा व्यक्तीला काहीच लाभ होत नाही. त्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती आणून सजावट आणि खाद्यपदार्थ यांवर आवश्यक तेवढाच व्यय केला, तर व्यक्तीला सर्वार्थाने काही प्रमाणात लाभ होईल, हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.
काही मूर्तीकारांचे ‘शाडू मातीची मूर्ती हाताळण्यास नाजूक असते’, असे म्हणणे आहे. मूर्तीमधील देवत्व जागृत झाल्यास भाविकांचा मूर्तीप्रती भाव वाढून ती आपोआपच व्यवस्थितपणे हाताळली जाईल. तसेच मूर्ती व्यवस्थित हाताळली जाण्यासाठी नागिरकांना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. धर्मशिक्षणानेच देवतेप्रती श्रद्धा आणि भाव यांत वृद्धी होते. असे झाल्यास मूर्तीकारांनाही आर्थिक अडचणी येणार नाहीत. तसेच खर्या अर्थाने श्री गणेशाची कृपाही संपादन करता येईल !
– सौ. अपर्णा जगताप, पुणे