गोव्यातील संचारबंदीत १२ जुलैपर्यंत वाढ

दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत, तसेच केशकर्तनालये आणि क्रीडा मैदाने चालू करण्यास मुभा

पणजी – गोव्यातील संचारबंदीत शासनाने आणखी १ आठवड्याने म्हणजे १२ जुलै या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. या वेळी नियमांत काही प्रमाणात शिथिलता आणतांना दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ऐवजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे केशकर्तनालये (सलून) आणि क्रीडा मैदानेही (आऊटडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स/स्टेडियम्स) उघडण्यास मुभा देण्यात आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषणा केली. गेल्या आठवड्यात केशकर्तनालय व्यावसायिकांनी त्यांची सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने ती चालू करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी केली होती.

राज्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ३ मासांत पहिल्यांदाच ५ टक्क्यांहून अल्प

राज्यात दिवसभरात १८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात कोरोनाविषयक ३ सहस्र ७०० चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ३ मासांत पहिल्यांदाच ५ टक्क्यांहून अल्प म्हणजे ४.९ टक्के झाले आहे. दिवसभरात २८५ रुग्ण बरे झाले, तर २९ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता २ सहस्र १७४ आहे.