‘गोमेकॉ’तील ‘ऑक्सिजन’चा तुटवडा तपासण्यासाठी न्यायिक अन्वेषणाला गोवा शासनाचा नकार

  • कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्यांच्या नोंदींचे परीक्षण (ऑडिट) करण्यास नापसंती

  • गोव्यातील कोरोना व्यवस्थापनाला अनुसरून गोवा खंडपिठात सुनावणी

असे असेल, तर प्रशासनाने सुव्यवस्थापन करून कोरोना रुग्णांच्या उपचारांतील अडचणी दूर कराव्या, असेच जनतेला वाटते !

पणजी, २१ जून (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (गोमेकॉ) ‘ऑक्सिजन’चा तुटवडा तपासण्यासाठी न्यायिक आयोग स्थापन करण्यास गोवा सरकारने नकार दर्शवला आहे. तसेच कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू पावलेल्यांच्या नोंदींचे परीक्षण (ऑडिट) करण्याची मागणीही गोवा शासनाने फेटाळून लावली आहे. गोव्यातील कोरोना व्यवस्थापनाला अनुसरून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठासमोर २१ जून या दिवशी सुनावणी झाली.

सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांना प्राण गमावावे लागले. कोरोनामुळे मृत पावलेले काही जण कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते, तर काही मुलांनी त्यांचे पालक गमावले आहेत, असा दावा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केला होता. सुनावणीच्या वेळी राज्याचे महाधिवक्ता देवीदास पांगम यांनी पुढील सूत्रे मांडली.

१. कोरोना महामारीच्या काळात आणि विशेषत: कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी आधुनिक वैद्य, परिचारिका, आरोग्यसेविका, अधिकारी आणि नोकरशहा यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. त्यांना न्यायालयीन चौकशीच्या अधीन ठेवणे अन्यायकारक ठरणार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग विचलित होण्याची शक्यता आहे. जनहिताच्या नावाखाली वैद्यकीय कर्मचारी आणि नोकरशहा यांनी अशी वागणूक देणे अयोग्य ठरेल.

२. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर न्यायिक अन्वेषणाचे आदेश देऊन कोणताही हेतू साधला जाणार नाही. ‘गोमेकॉ’त ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याच्या प्रकरणी अन्वेषणासाठी राज्य सरकारने यापूर्वीच समिती स्थापन केली आहे.

३. कोरोनाचा संसर्ग झाल्याने मृत पावलेल्यांचा आकडा शासनाने कमी दाखवलेला नाही; मात्र काही खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचा अहवाल उशिरा दिल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा रुग्णालयांकडून कायद्यानुसार दंड आकारला जाणार आहे.

४. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेची सिद्धता करण्यासाठी गोवा सरकारकडे ४० के.एल्. ऑक्सिजन आणि जीवनरक्षक औषधे यांचा अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या अनुभवावरून ‘कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या वेळी ऑक्सिजन आणि जीवनरक्षक औषधे यांची कमतरता भासणार नाही’, असे वाटते. तज्ञ समितीला ऑक्सिजन आणि जीवनरक्षक औषधे यांचा अतिरिक्त साठा (बफर स्टॉक) अन् साधनसुविधा यांच्या सिद्धतेला अनुसरून आढावा घेण्याची विनंती करू.